बारामती : पुणे शहरात कोरोना व्हायरसची बाधा झालेले रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात कोरोना व्हायरसची बाधा झालेले रुग्ण दाखल झाल्याच्या अफवेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्तीचे संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बारामती उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वैद्यकीय कक्ष, आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.बारामती पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्यावतीने तालुका आरोग्याधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आपण संशयित कोरोना रुग्ण शोधमोहीम तालुक्यात राबविण्यात येत आहे. परदेशी प्रवास केलेल्या नागरिकांचा व सहवासीतांचा शोध बारामती तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत करीत आहे. आवश्यकतेप्रमाणे प्रवासी यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करून गरज असल्यास पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे पाठवण्यात येईल.बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले, की बारामतीमार्फत एक स्पेशल वॉर्ड तयार केला आहे. कोणत्याही परिस्थितीसोबत मुकाबला करण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील सर्व प्रा. आ. केंद्र, नागरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय येथे शीघ्र प्रतिसाद कक्ष उघडण्यात आला आहे. सर्व शीघ्र प्रतिसाद कक्ष येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तालुका आरोग्याधिकारी यांना व तालुका शीघ्र प्रतिसाद कक्ष याच्याकडे दैनंदिन अहवाल सादर करतील. बारामती तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील सर्व पंचतारांकित हॉटेल व्यावसायिक यांना परदेशी प्रवासी आल्यास त्वरित आरोग्य विभाग, पंचायत समिती बारामती येथे कळविण्याची सूचना तालुका आरोग्याधिकारी डॉ. खोमणे यांनी केली आहे.परदेशातून आलेल्या प्रवासी व सहवासीत यांनी आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. शंका असल्यास त्वरित आरोग्य विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी केले आहे. ..............रुग्ण दाखल झाल्याची अफवा : डॉ. वाबळेशहरातील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण दाखल असल्याच्या अफवेने गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला आहे. ही अफवा हॉस्पिटलच्या प्रमुखांसह स्टाफला डोकेदुखी ठरली आहे. आमच्या रुग्णालयात कोणताही कोरोना व्हायरसचा रुग्ण दाखल नाही, ही केवळ अफवा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत, चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझर किंवा साध्या साबण-पाण्याने हात धुवावेत, खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्यूपेपर धरावा, टिश्यू लगेच कचरापेटीत टाकून द्यावा, खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, शेकहॅण्ड करू नये, सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांपासून चार ते पाच फूट लांब राहावे, असे आवाहन डॉ. आर. डी. वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.ऱ्या