पुणे : रेड झोनसह पुणे शहरातील किराणा माल, भाजीपाला व दुधविक्रीची दुकाने सोमवारपासून दोन तासाऐवजी, चार तास उघडी ठेवण्याबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चा झाली असून त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण पुणे शहरातील सदर दुकाने सकाळी १० ते १२ ऐवजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कोरोनाचा वाढता प्रसार व रस्त्यावर खरेदीच्या नावाखाली बाहेर पडणारी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मेडिकल वगळता केवळ किराणा माल, भाजीपाला व दुधविक्रीची दुकानांना रेड झोनमध्ये सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र या दोन तासात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येत असल्याने फिजिकल डिस्टसिंग पाळले जात नसल्याचे आढळून आले. परिणामी हा वेळ जास्त वाढून दिला तर ही होणारी गर्दी टाळता येऊ शकते, याबाबत पोलीस सहआयुक्त डॉ.रविंद्र सिसवे यांच्याबरोबर महापौर मोहोळ यांनी रविवारी चर्चा केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेत दुकानांची वेळ वाढवून नागरिकांना अधिकचा वेळ दिला तर, होणारी गर्दी टाळता येईल याबाबत विचार झाला़ व त्यानुसार सील केलेल्या भागासह संपूर्ण पुणे शहरातील सदर दुकानांची वेळ सकाळी दहा ते दुपारी २ पर्यंत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.