मुंबई : कोरोना व्हायरसचा धसका एवढा आहे की प्रसिद्ध भारतीय उद्योजकाच्या पुण्यातील आयटी कंपनीला काम बंद करावे लागले आहे. कोरोनाचा व्हायरस पसरू नये यासाठी आयटी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, पुण्यातील टेक महिंद्रा सुरुच होती. यावर सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनी कंपनीच्या मॅनेजरला झापले आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
विमाननगर येथील टेक महिंद्रा या आयटी कंपनीमध्ये जाऊन संजीवनी फाऊंडेशन या संस्थेच्या प्रमुख विशाखा गायकवाड यांनी मॅनेजरला तंबी दिली. तसेच कर्मचाऱ्यांनाही ठरवून कामावर न येण्याचे आवाहन केले.
जबदरस्तीने काम बंद करायला सांगण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशातून आयटी कंपन्या, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या वगळल्यानंतरही जबरदस्तीने केले जाणारे हे प्रकार म्हणजे दादागिरी असल्याची टीका होऊ लागली आहे. गायकवाड या मनसेच्या कार्यकर्त्या असून पूर्वी त्यांनी शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
टेक महिंद्रामध्ये कर्मचारी हजर होते. यावेळी गायकवाड यांनी त्यांच्या महिला मॅनेजरला मी उद्यापासून गेटवर माझी माणसे ठेवणार असून कोणालाही आत बाहेर जाऊ देणार नाही. आतील लोक आतच राहतील आणि बाहेरून येणारे लोक बाहेरच राहतील. खायचा डबाही येणार नाही. माझ्या परिसरामध्ये कोरोनाची लागण नको, असा इशारा दिला.
याचबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांना सुटीही देण्यास सांगितले. तुमच्या नुकसानीचे वरिष्ठांशी बोलून घेऊ, ऐकायचे तर ऐका नाहीतर तुम्ही आणि तुमचा जीव, असा इशारा दिला.
महत्वाचे म्हणजे टेक महिंद्रा कंपनीमधूनही एका मोबाईल कंपनीच्या नेटवर्कचे काम चालते. त्यामुळे ही सेवा बंद करता येणार नाही.
मनसेने अंतर ठेवले
मनसेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांनी विशाखा गायकवाड या मनसेच्या अधिकृत पदाधिकारी नाहीत. ही त्यांची भूमिका वैयक्तीक असल्याचे स्पष्ट केले. याचबरेबर पक्षाशीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.