पुणे - कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र रविवारी थांबले असून, दिवसभरात एकाही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही़ विशेष म्हणजे रविवारचा हा दिवस आनंदवार्ता घेऊन आला असून, आज तब्बल १८ कोरोनाबाधित असलेले रूग्ण पूर्णपणे ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. लॉकडाऊननंतर ६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मात्र वाढत आहे़ रविवारी या संख्येत ४२ ने वाढ झाली असून, आत्तापर्यंत पुणे शहरात (पुणे महापालिका हद्दीत) एकूण ५८६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ यापैकी शहरातील ४९ जणांचा व बारामतीतील १ अशा ५० जणांचा मृत्यू शनिवारपर्यंत झाला असला तरी हे सर्व रूग्ण कोरोनाबरोबर अन्य जर्जर आजाराने ग्रस्त होते. रविवारचा दिवस सर्वांना दिलासा देणारा ठरला असूून आज तब्बल १८ जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले आहे़ आजपर्यंत एकूण ५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या नायडू हॉस्पिटलमध्ये १८१ रूग्णांवर उपचार चालू असून, यापैकी एकही रूग्ण गंभीर नसल्याचे आढळून आले आहे़ एकट्या नायडू हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत ३० रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत़ तर ससून हॉस्पिटलमधून ७ जण, जहाँगिर हॉस्पिटलमधून १, भारती हॉस्पिटलमधून १ व दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून ३ रूग्ण उपचाराअंती घरी गेले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांपैकी १५ गंभीर रूग्णांमध्ये ११ रूग्ण हे एकट्या ससून हॉस्पिटलमध्ये आहेत़ तर अन्य रूग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत़
coronavirus : पुण्यात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, मात्र रुग्णांच्या संख्येत ४२ ने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 10:51 PM