पुणे - देशात कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहेत. देशातील अनेक राज्यात रूग्ण आढळायला लागले आहे. यामुळे इतर राज्येही या विषाणूशी लढण्याची तयारी करत आहेत. मात्र, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतच (एनआयव्ही) नमुण्यांची तपासणी होत असल्याने, एनआयव्ही आता इतर राज्यातील वैद्यकीय पथकांनाही प्रशिक्षण देणार आहे. गोव्यात रूग्ण आढळल्याने गोव्यातील डॉक्टरांचे विषेश पथक प्रशिक्षणासाठी नौदलाच्या विमानाने बुधवारी पुण्यात दाखल झाले.
गोव्यात कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. यामुळे गोव्यात करोना विषाणू प्रदूभार्वाचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय संसाधने आणि चाचणी केंद्रांच्या उभारणीसाठी गोवा राज्याने त्यांचे वैद्यकीय पथक प्रशिक्षणासाठी बुधवारी पुण्यात पाठवले. गोवा मेडिकल कोलेजच्या मायक्रोबायोलाजी विभागाचे प्रमुख डॉ. सॅव्हीओ रौड्रीगेज यांच्या नेतृत्वाखाली ४ डॉक्टरांचे पथक राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत प्रशिक्षण घेणार आहे. २७ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या या पथकाकडून काही नामुनेदेखील तपासणीसाठी आणण्यात आले आहे.
या डॉक्टर्सना पुण्यात आणण्यासाठी नौदलाने सहकार्य केले. नौदलाच्या डॉर्निअर विमानाद्वारे आयएनएस हंसा या गोव्यातील नौदल तळावरून उड्डाण घेत, हे वैद्यकीय पथक पुण्यात पोहचले. मंगळवारी (दि २४) गोवा राज्य शासनाने येथील नौदल प्रमुखांना मदत मागितली होती. त्यावर तातडीने हालचाल करत नौदलातर्फे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत ही मदत पुरविण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नौदलातर्फे या पथकाला पुन्हा एकदा गोव्यात पोहचविले जाणार आहे.