- निनाद देशमुखपुणे : परदेशात असलेल्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी तसेच त्याना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी जैसलमेर येथे जागतिक दर्जाचे आर्मी वेलनेस सेंटर तयार करण्यात आली आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असून गेल्या दोन दिवसांत इराण येथून लष्कराने २८९ भारतीयांना परत आणले आहे. या वेलनेस सेंटरमधील जवळपास २० हॉलमध्ये या सर्वांवर लष्कराचे डॉक्टर उपचार करत आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, लष्कराचे प्रसिद्धी प्रमुख कर्नल अमन आनंद यांनी ‘लोकमत’ला दिली.इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय असून त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे ही जबाबदारी असून शुक्रवारी एका विशेष विमानाने २३६ भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात आले. तर रविवारी ५३ भारतीयांना भारतात आणण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी तसेच उपचार करण्यासाठी लष्कराच्या आरोग्य विभागाने विशेष पथकाची स्थापना केली आहे.जैसलमेर आर्मी वेलनेस सेंटरमध्ये जवळपास २० हॉलमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी परदेशातून आणलेल्या नागरिकांना येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यासाठी लष्कराचे दोन पथके तयार केली आहेत. पहिल्या पथकात त्यांची आरोग्य तपासणी करणारे वैद्यकीय पथक, तज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक कार्यरत राहणार आहेत. तर दुसऱ्या पथकात परिसराची स्वच्छता करणारे कर्मचारी, तसेच त्यांना अन्न तसेच जीवनावश्यक वस्तू देणारे पथक कार्यरत राहणार आहे, असे या पथकाचे आरोग्य अधिकारी कर्नल एस. अहमद यांनी सांगितले.
Coronavirus : इराणमधून आलेल्या भारतीयांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:12 AM