पुणे : कदमवाकवस्ती(ता.हवेली) येथील कवडीपाट माळवाडी परिसरातील कोरोनाबाधीत सत्तर वर्षाच्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या संपर्कात आलेल्या पंचवीस पैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबराेबर महिलेच्या संपर्कात आलेल्या आणखी पंधरा जनांना कोरोना चाचणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.३) नेले आहे.
कदमवाकवस्ती हद्दतील एका रग्नालयात उरुळी कांचन येथील सत्तेचाळीस वर्षीय महिला व तिच्यावर उपचार करणारे रुग्नालयातील एक डॉक्टर व दोन नर्स असे चार जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले हाेते. तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी परीसरातील तीन रुग्ण एकाचवेळी कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना तीन दिवसापुर्वी मृत्युमुखी पडलेली माळवाडी येथील सत्तर वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचे समाेर आले. महिलेचा मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न होताच, आरोग्य विभागाने महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचवीस नातेवाईकांची पहिल्या टप्प्यात कोरोना चाचणी करुन घेतली. यात पंचवीस पैकी दोन जण कोरोना बाधीत असल्याचे उघड होताच, आरोग्य विभागाने रविवारी दुपारी संबधित महिलेच्या संपर्कातील आणखी पंधरा जणांना चाचणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे.