पुणे :कोरोनाच्या भीतीने रस्त्यात चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला उचलण्यास नागरिक तयार नसल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली होती. मात्र त्याच पुण्यात आता कुठलाही संबंध नसताना केवळ माणुसकी म्हणून विद्यार्थ्यांना विनामूल्य जेवण देत असणारी माऊली समोर आली आहे. या व्यक्तीचं नाव आहे विद्या जितेंद्र जोशी.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुण्यात झाला असताना तो वाढू नये म्हणून अनेक हॉटेल, खानावळी बंद आहेत. अशावेळी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि मूळ पुणेकर नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून जोशी कुटुंब पुढे सरसारवले आहे. हेच कुटुंब केवळ माणुसकी म्हणून पुण्यात दाखल असणाऱ्या रुग्णांनाही डबे पुरवते. आता त्या पलीकडे जाऊन कोरोनाच्या संकटात त्यांनी पुन्हा सामाजिक बांधिलकी जपली आहे.
विद्या या स्वतः महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मेस काही कारणाने बंद होती. त्याकाळी सांगलीसारख्या ठिकाणी सध्याच्या काळासारखी खूप हॉटेल नव्हती. त्यामुळे त्यांना ऐन परीक्षेत चक्कर आली. रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि त्यांची त्या विषयाची परीक्षा बुडली होती. त्यावेळी आलेला अनुभव त्याच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला आहे. त्यामुळे कोरोनाचा अप्रादुर्भाव झाल्यावर त्यांनी तात्काळ गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर दिवसरात्र कायदा, सुव्यवस्था राखणारे पोलीस आणि आरोग्य राखण्यासाठी झटणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांनाही त्या कोरडे खाद्य पदार्थ पुरवत आहेत. विद्या यांचा स्वतःचा व्यवसाय असून त्यासंदर्भाने त्या अनेक महिलांसोबत संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचे स्टेटस बघून अनेक महिलांनी हे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र कोरोनात एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज असल्याने त्यांनी संबंधित महिलांनाही त्यांच्या भागात गरजू विद्यार्थ्यांसाठी अशी मदत केंद्र सुरु करण्याची विनंती केली आहे.
याबाबत लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'डब्यात डाळ, तांदूळ आणि वस्तू साठवून ठेवण्यापेक्षा त्या गरजू व्यक्तींसाठी उपयोगी पडणे अधिक महत्वाचे आहे. शेवटी वस्तू संपण्यासाठी आहेत आणि कोरोनाही आज ना उद्या जाणार आहे मात्र माणुसकी कायमस्वरूपी टिकणार आहे. आपण तोच विचार करायला हवा. शेवटी बाहेरून येणारे विद्यार्थी हे पुणेकरांचे पाहुणे आहेत आणि आपल्यावर त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना मदत करायलाच हवी असे मला वाटते'.