पुणे : काेराेनाचा प्रभाव राज्यात वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. दरराेज काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. पुण्यात आता पुन्हा एकदा एका रुग्णाची वाढ झाली असून आता पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या 17 वर गेली आहे. पुण्यातील हाॅटेल आता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबराेबर पुण्यातील व्यापारी संघाने तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.
राज्यातील पहिला काेराेनाबाधित रुग्ण पुण्यातील सिंहगड राेड परिसरातील असल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर त्या भागामध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्याजवळच्या नांदेड गावात काेराेनाच्या विषाणुचा फैलाव हाेऊ नये यासाठी आता ग्रामपंचायतीकडून गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. गावाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीवर आणि सामानावर 1%सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. कुठले वाहन असले तरी त्याच्यावर फवारणी केल्याशिवाय ते वाहन गावात साेडले जात नाही. गावात येणाऱ्या चारही रस्त्यांवर ही फवारणी करण्यात येत आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 यावेळेत ही फवारणी करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतीचे चार ते पाच कर्मचारी विविध शिफ्ट्समध्ये कार्यरत आहेत. गावाबराेबरच जवळच असणाऱ्या नांदेड सिटी या साेसायटीच्या सर्व गेटवर सुद्धा ही फवारणी करण्यात येत आहे.
याबाबत फवारणी करणारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुशांत सावंत म्हणाले, काेराेनाचा प्रादुर्भाव पुण्यात वाढताेय. आमच्या गावात हा विषाणु बाहेरुन येणाऱ्या नागरिकामुळे येऊ नये यासाठी आम्ही प्रत्येक गाडीवर आणि गाडीच्या आत औषध फवारणी करत आहाेत. गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही फवारणी करण्यात येत आहे. यात आम्ही एकाही वाहनाला फवारणी न करता गावात प्रवेश करु देत नाही. गावात हा विषाणु येऊ नये यासाठी आम्ही ही खबरदारी घेताेय. जाेपर्यंत काेराेनाचा प्रभाव कमी हाेत नाही, ताेपर्यंत आम्ही ही फवारणी करणार आहाेत.