ओझर - जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर १ येथे कंटेन्मेंट झोन असल्याने गावात सोडायच्या कारणावरून पोलिसांसोबत झालेल्या वादावादीनंतर एका महिलेने सर्वासमोर विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.अनुजा रोहिदास शिंगोटे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.शिंगोटे हे शेतकरी कुटुंब आहे. भाजीपाला ते नेहमी छोट्या टेम्पोतून विक्रीसाठी गावातून बाहेर नेत असतात. उंब्रज येथे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पोलीसांनी नाकाबंदी केली आहे. जा-ये करणा-यांची चौकशी केली जाते. मंगळवारी शिंगोटे कुटुंबीय उंब्रजला गावी जात होते. त्यांचा टेम्पो पोलिसांनी अडवला. चौकशी करत असताना पोलिसांत आणि शिंगोटे कुुटुंबीयात वाद झाला.
दरम्यान, वाद विकोपाला गेल्याने अनुजा शिंदे यांनी सर्वांसमोर विष प्राशन केले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की बंदोबस्तास नेमणूक केलेले हवालदार नरसिंगे, एक होमगार्ड आणि दोन आरसीपी महिला कॉन्स्टेबल नाक्यावर होते. त्यांनी शिंगोटे कुटुंबास टेम्पो नेऊ नका, असे सांगत ग्रामपंचायतीने ज्या पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे त्याचा वापर करा, असे सांगितले. परंतु शिंगोटे हे त्याच ठिकाणाहून वाहन नेण्याचा हट्ट करत होते. सरपंच सपना उमेश दांगट म्हणाल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त आहे.तपासनाक्यावर गाडी अडविल्याने शिंगोटे कुटुंबीय पोलिसांशी वाद घालत होते. त्यांचा वाद पाहून शंभरावर ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला दरम्यान रोहिदास यांनी विषाची बाटली आणली. ग्रामस्थांनी त्यांना अडविल्याने बाटली खाली पडली. गोंधळात अनुजा यांनी बाटली उचलत विष प्राशन केले.