पुणे : शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या विविध घटकांतील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करुन दिली जातात. यासाठी मंगळवारी (दि. १२ जून ) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ९ कोटी १४ लाख रुपयांची औषधांची खरेदीसाठी मान्यता देण्यात आली. यात ब्रॅण्डेड व जेनरिक औषधांची खरेदी केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये शहरातील विविध घटकातील रुग्ण उपचार घेतात. यामध्ये दुर्बल घटकातील उपचार घेणा-या रुग्णांची संख्या येथे जास्त असते. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणा-या रुग्णांना औषधे तसेच इतर साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. यात पाच लोकांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यापैकी नरेंद्र मेडिकल्स यांनी ब्रँण्डेड औषधे व इतर इतर साहित्याच्या छापील किंमतीवर २३ टक्के इतकी सूट जीएसटी करासहित तर जेनेरीक औषधे व इतर साहित्यांच्या छापील किंमतीवर ५१ टक्के इतकी सूट जीएसटी करासहित देण्याची तयारी दाखविल्याने ५ कोटी रुपयांपर्यंतच्या औषधांची खरेदी करुन त्यासाठी आवश्यक करार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.याबरोबरच स्थानिक खरेदी अंतर्गत परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेकरीता दैनंदिन स्वरूपात औषधे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत सुमारे ४ कोटी १४ लाख रुपयांपर्यंत औषधांची खरेदी केली जाणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
महापालिका करणार ९ कोटींची औषधे खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:11 PM
महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये शहरातील विविध घटकातील रुग्ण उपचार घेतात. दुर्बल घटकातील उपचार घेणा-या रुग्णांची संख्या येथे जास्त असते.
ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी ब्रॅण्डेड व जेनरिक औषधांची खरेदी केली जाणार