पुणे : ‘शहरातील कॉर्पोरेट रुग्णालये म्हणजे उपचारांच्या नावाखाली पैसे कमावण्याचे कारखाने बनले आहेत. त्यामुळे महापालिकेने पैसे, जमीन, टीडीआर आदी माध्यमांतून आतापर्यंत दवाखान्यांना केलेली मदत चक्रवाढ व्याजासह वसूल केली पाहिजे. आयसीयूमध्ये रुग्ण असेल तर दिवसाला ७५ हजार ते लाख रुपयांचे बिल उकळले जाते. पुण्यातील कॉर्पोरेट रुग्णालयांची नांगी ठेचली पाहिजे, अशा संतप्त व उद्विग्न प्रतिक्रिया पुणेकरांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केल्या.
पुण्यातील चार खासगी रुग्णालयांनी महापालिकेकडून सवलती लाटत ‘फ्री बेड’चा करार केला. मात्र, वर्षानुवर्षे नाममात्र रुग्णांवर उपचार केले अन् त्या खाटांवर इतर रुग्णांना दाखल करून पैसे कमावले. खासगी हाॅस्पिटलची ही नफेखाेरी ‘लाेकमत’ने बुधवारच्या (दि. ३) अंकात ‘सह्याद्रीसह चार रुग्णालयांनी लाटला फ्री बेडचा मलिदा’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली. त्यावर पुणेकरांनी ‘लाेकमत’चे आभार मानले व हाॅस्पिटलच्या नफेखाेरीचा निषेध व्यक्त केला.
पुणेकर म्हणाले...
''हाॅस्पिटल्सनी सरकार दरबारी सादर केलेले रिपाेर्ट्स माहितीच्या अधिकारात बाहेर काढले पाहिजेत व तपासले पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांनी ‘अर्थ’पूर्ण चुका केल्या असतील तर त्यांना ताबडताेब बडतर्फ केले पाहिजे, तसेच त्यांच्यावर देशद्राेहाचा गुन्हा दाखल करत त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे. दवाखान्यांनाही दंड केला पाहिजे. आतापर्यंत दवाखान्यांना पैसे, जमीन, टीडीआर आदी स्वरूपात जी काही मदत केली ती चक्रवाढ व्याजासह वसूल केली पाहिजे. गरजू लाेकांना मार्गदर्शन, इलाजाच्या पत्रासाठी महापालिकेत जायला नकाे तर पालिकेचाच एक व्यक्ती रुग्णालयात बसला पाहिजे. - किरण भोसेकर, माजी राष्ट्रीय कब्बडीपटू व प्रशिक्षक''
''गरीब रुग्णांना उपचार मिळवून देणे ही पुणे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पुणे मनपा व हॉस्पिटल प्रशासन यावर कोणाचाही अंकुश नाही. नागरिकांना स्वतः आंदोलन करून आपले हक्क मिळवावे लागतील. हॉस्पिटलने उपचार नाकारल्यास त्वरित जाब विचारायला पाहिजे. तक्रार नोंदवली पाहिजे. ‘लोकमत’च्या चळवळीत लोक सामील झाले तर बदल नक्की होईल.- अनिल करंजावणे, सचिव, साई एज्युकेशनल ट्रस्ट, पुणे''
''फार पूर्वीपासून हा प्रकार सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय यंत्रणेतील अधिकारी खायलाच बसलेले आहेत. त्यांचे हात ओले झाले की मग ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’. अशा वेळी गरीब रुग्णांनी सांगायचे कोणाला? मनाला वाटेल ते करणारच हे हॉस्पिटल. या गोष्टींना अंत नाही. या लोकांना वठणीवर आणायला देशात धडाकेबाज नेता पाहिजे. नाहीतर मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खायला तयारच आहेत सगळे. - एक डाॅक्टर''
''सध्याच्या काळात हाॅस्पिटल हा एक स्मार्ट, परंतु निर्दयी बिझनेस झाला आहे. यामध्ये शासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. या संस्थांचे समाजसेवक हाॅस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सवलती, कायदे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करतील. - विश्वास पाटील, एक जागरूक नागरिक''
''हाॅस्पिटलवर कारवाई करा. गरीब लाेक मरत आहेत. त्यावर काहीतरी मार्ग काढून गाेरगरिबांचे प्रश्न दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. - भारत जाेरी, नागरिक''