पुणे : शहरात लसीकरण मोहीम राबवित असून १८ ते ४४, ४५ च्या पुढील वयोगट, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करला लस देत आहे. परंतु, अनाथाश्रम, एड्सग्रस्त मुले, वृद्धाश्रम, आजारी व्यक्ती आदी असहाय घटकांना थेट त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण केले जाणार आहे. त्याकरिता स्पेशन बस तयार करण्यात आल्या असून या मोहिमेला ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ असे नाव दिले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्ती, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत जे लसीकरण केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यातच लसीकरण केंद्रांवरील गर्दीही वाढत चालल्याने मुळातच ‘इम्युनिटी’ कमी असलेल्या या नागरिकांना अधिक धोका होऊ शकतो. या घटकांसाठी ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
पालिकेला या उपक्रमासाठी काही संस्थांनी मदत केली आहे. सध्या चार बस तयार केल्या आहेत. भविष्यात प्रत्येक प्रभागात एक मोबाइल व्हॅन सुरू करण्याचा विचार आहे. काही संस्थांसोबत एममोयूदेखील केला आहे.
--
येत्या काही दिवसांत शहरातील लसींचा पुरवठा सुरळीत होईल. त्यानंतर लसीकरणही सुरळीत सुरू होईल, असा विश्वास अगरवाल यांनी व्यक्त केला. ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’द्वारे लसीकरण करताना वयोगटाची अट पाहिली जाणार नाही तर, आवश्यकता पाहून लस देणार आल्याचे सांगण्यात आले.