लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत. पण बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्यापैकी कारवाई करायची तरी नेमकी कोणी या वादात येथील अतिक्रमणे मात्र वाढत चालली आहेत.
पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर फॅशन स्ट्रीटसारखेच तीन मार्केट उभे राहिली आहेत. येथील दुकाने इतकी दाटीवाटीने लावली आहेत की नुसते उभे राहीले तरी गुदमरायला व्हावे. हे मार्केट उभी राहिली ती गेल्या काही वर्षातच. आधी मुख्य रस्त्यावर टपऱ्या आल्या आणि पाठोपाठ हा रस्ता ‘शॉपिंग डेस्टिनेशन’ झाले. हे होता होताच उभी राहिली ती ही शॉपिंग मार्केट. केसरिया लेन, शिरोळे मार्केट आणि हॉंगकाँग लेन या तिन्ही ठिकाणी आता जवळपास प्रत्येकी पन्नासपेक्षा जास्त दुकाने आहेत. आजूबाजूला जागा करत हे मार्केट वाढतंय पण थाटलेल्या दुकानांचा असा भुलभुलैया तयार झाला आहे की एखादी दुर्घटना झाली तर त्यातून वाचणं कठीण व्हावं.
फॅशन स्ट्रीटचा आगीचा दुर्घटनेनंतर इथल्या दुकानदारांच्या मनात देखील ही भीती स्पष्ट दिसतेय. पण याबाबत विचारल्यावर ते म्हणतात, “अशी कोणती घटना होऊ नये म्हणून आम्ही दररोज पूर्ण तयारी करतो. इथे दुकानांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर ठेवले आहेत. तसेच आम्ही रात्री जाताना पण दुकानासमोर पाणी मारून जातो.” ही तीन मार्केट तर ऐन शहरातली प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण तुळशीबागेपासून ते इतर अनेक ठिकाणी अशा मार्केटच्या रूपाने अतिक्रमणाचा विळखा पडलेला पाहायला मिळतो. पण यावर कारवाई करण्यासाठी मात्र महापालिकेचे दोन विभाग एकमेकांकडे बोट दाखवतात. अतिक्रमण विभागाच्या मते ही जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. तर बांधकाम विभागाच्या मते अतिक्रमण कारवाई होणे आवश्यक आहे. या वादात या मार्केट मधल्या दुकानांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. आता फॅशन स्ट्रीट दुर्घटनेनंतर तरी या अतिक्रमणावर काही कारवाई होते का ते पाहावे लागेल.