पुणे : पालिकेच्या विविध विभागांमध्ये नेमलेल्या कंत्राटी कामगारांना यापुढे किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. शासनाच्या २०१५ सालच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार असून या निर्णयाचा फायदा सात ते आठ हजार कुशल व अकुशल कामगारांना होणार आहे.
स्थायी समितीने या कामगारांना किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पालिका आयुक्तांनी आदेश काढल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे कुशल कामगारांना १९ हजार तर अकुशल कामगारांना १६ हजार रुपयांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विविध विभागातील विकास प्रकल्प तसेच देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे ठेकेदारांकडून कंत्राटी पद्धतीने कामगारांची नियुक्ती केली जाते. कंत्राटी कामगारांचे वेतन शासनाकडून वेळोवेळी निश्चित केले जात असते.
शासनाने २०१५ साली अधिसूचना काढत सुधारित वेतनदर निश्चित केले होते. या आदेशामध्ये पालिकेचा समावेश शेड्यूल इंडस्ट्रीमध्ये झाल्याने पालिकेकडून सफाई आयोग, शॉप अॅक्ट, अभियांत्रिकी सेवा असे निकष, कामाच्या स्वरूप, प्रत्येक कर्मचा-यास स्वतंत्र वेतन दिले जात होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याच्या वेतनात आलेला फरक नवीन आदेशामुळे नाहीसा होऊन एकसमान वेतन मिळणार आहे. हा लाभ देताना कामगारांची कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशी वर्गवारी केली जाणार आहे. कामगारांना ईएसआय तसेच ईपीएफही दिला जाणार आहे.
====
कंत्राटी कामगारांचे सुधारित वेतन
वेतन घटक कुशल अर्ध कुशल अकुशल
मुळ वेतन 14,000 13,000 11,500
विशेष भत्ता 5,250 5,250 5,250