लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे महापालिकेच्या फेब्रुवारी, २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग दोनचा राहणार की चारचा, या चर्चेला बुधवारी (दि. २५) निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला. एक सदस्यीय प्रभाग जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांची गणिते बदलणार आहेत. या निर्णयामुळे पुण्यातील नगरसेवकांची संख्या केवळ दोनने वाढणार असून, ती १६६ होईल.
शासनाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिध्द केलेली एकसदस्यीय प्रभाग पध्दतीच फेब्रुवारी, २०२२ च्या निवडणुकीसाठी लागू राहणार आहे. याकरिता सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन, महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा, अशी सूचना आयोगाने केली आहे. सुमारे २१-२२ हजार मतदार एक नगरसेवक निवडून देतील, असे चित्र पुण्यात असेल. महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम २७ ऑगस्टपासून सुरू केले जाईल. साधारणत: महिन्याभरात ते पूर्ण केले जाईल.
महापालिका हद्दीत ११ गावे समाविष्ट होण्यापूर्वी म्हणजेच सन २०१७ पर्यंत महापालिकेची सदस्य संख्या १६२ होती. अकरा गावांच्या समावेशामुळे ही सदस्य संख्या दोनने वाढली आणि ती १६४ झाली. आता नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे शहरातील लोकसंख्येत (सन २०११ च्या जनगणनेनुसार) साधारणत: १ लाख ९० हजार मतदारांची भर पडणार आहे़
आयोगाच्या नियमावलीनुसार २१ हजार ४२३ लोकसंख्येला एक प्रभाग अशी रचना असेल. यात १० टक्के लोकसंख्या कमी-जास्त गृहीत धरली तरी, शहरातला एक मतदारसंघ हा आता कमीत कमी १९ हजार २८१ लोकसंख्येचा अथवा जास्तीत जास्त २३ हजार ५६३ लोकसंख्येचा तयार होणार आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील लोकसंख्येसह शहरातील एकूण लोकसंख्या ३५ लाखांपर्यंत जाईल. यातून केवळ दोन प्रभाग वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे आगामी महापालिकेतील सदस्य संख्या १६६ झालेली असेल.