पुणे : महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर दिवाळीचे स्टॉल न लावता पदपथ अडविणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या स्टॉलवर कारवाई करू नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवक आज मुख्य सभेत सरसावले. दिवाळीच्या या सात दिवसांत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी या नगरसेवकांनी केली.रस्त्यावर व पदपथांवर अनधिकृतपणे पथारी मांडून व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे. तसेच, शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत फटाका विक्रीच्या स्टॉलवरही सध्या कारवाई सुरू झाली आहे. मात्र, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. दीपावलीपुरता ते व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नका, असा आव आणत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. मुख्य सभेत सभागृह नेते सुभाष जगताप यांनी प्रशासनाच्या कारवाईस पाठिंबा न देता, या व्यावसायिकंवर कारवाई करू नये, अशी मागणी केली. त्याला भाजपचे गटनेते गणेश बिडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे, तसेच पृथ्वीराज सुतार, रवींद्र माळवदकर यांनीही पाठिंबा देऊन कारवाईला जोरदार विरोध दर्शविला. अतिक्रमण विभागातील कारवाई करणाऱ्या कर्मच्चाऱ्यांना दीपावलीपुरते सात दिवस अन्यत्र बदलीवर पाठवा, अशी अजब सूचना जगताप यांनी या वेळी केली. तर, कात्रज चौकातील बस आगारावरील पार्किंगच्या जागेत पथारी व्यावसायिकांना बसण्यास हंगामी परवानगी द्या, अशी मागणी मोरे यांनी केली. डॉ. सिद्धार्थ धेंडेही यांनी पदपथावर विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्या, अशी सूचना केली. उपमहापौर आबा बागूल यांनीही सदस्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)
अनधिकृत स्टॉलधारकांसाठी नगरसेवक सरसावले
By admin | Published: October 21, 2014 5:25 AM