पिंपरी : अवैध बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे पद रद्द ठरविण्याबाबतचा लांबणीवर टाकण्यात येत असलेला प्रस्ताव अखेर मंजूर झाला. उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना आदेश देत विषय मार्गी लावण्यास बजावले होते. त्यानुसार कायदा विभागाने गुरूवारी सर्वसाधारण सभेपुढे न्यायालयीन आदेशाची प्रत सादर केली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला नाइलाजास्तव हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नगरसेवक नितीन काळजे आणि विनया तापकीर यांचे पद धोक्यात आहे.अवैध बांधकाम केलेल्या नगरसेवकांना पात्र अथवा अपात्र ठरविण्याबाबत न्यायालयाचे मत मागविण्यासाठी प्रशासनाला परवानगी देण्याच्या प्रस्ताव गुरूवारी ठेवण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक काळजे आणि नगरसेविका तापकीर हे अनधिकृत बांधकामामुळे अडचणीत आले आहेत. चऱ्होलीतील अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर त्यांच्याकडून महापालिकेने खुलासा मागवला. त्यांचे पद पात्र ठरवायचे की, अपात्र याबाबत महापालिका न्यायालयाचे मत मागविणार आहे. त्यासाठी प्रशासनाला परवानगी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. विनाचर्चा प्रस्ताव मंजूर केला.फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नितीन काळजे आणि विनया तापकीर हे निवडून आले आहेत. नितीन काळजे व विनया तापकीर यांचे चऱ्होलीत अनधिकृत बांधकाम असल्याबाबत निर्मला विजय तापकीर यांनी २९ डिसेंबर २०१३ रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी दोघांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली . या याचिकांवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न्यायालयाच्या कार्यकक्षेत असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम २०१२ च्या कलमानुसार नगरसेवक नितीन काळजे व विनया तापकीर यांना १० फेब्रुवारीला बांधकामाबाबत खुलासा मागविण्यासंदर्भात नोटीस बजावली. (प्रतिनिधी)
नगरसेवक विनया तापकीर, काळजे यांचे पद धोक्यात
By admin | Published: November 21, 2014 4:03 AM