पुणे : पुणेकरांची टीका करण्याची पद्धत सर्वश्रुत अाहे. नेमक्या शब्दांमध्ये समाेरच्यावर उपराेधिक टीका करण्यात पुणेकर नेहमीच अग्रेसर असतात. त्यातही पुणेरी पाट्या अाणि पुणेकर ही पुण्याची महत्त्वाची अाेळख. अशाच एका पाटीमधून पुणेकरांनी नगरसेवकांचे कान उपटले अाहेत. पुण्यातील प्रभाग क्र. 33 मध्ये ''नगरसेवक हरवले अाहेत'' असे बॅनर लावण्यात अाले अाहेत. रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यावर येणारे मैलापाणी याला कंटाळून येथील नागरिकांनी असे फलक प्रभागात लावले अाहेत. हे फलक अाता पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाले अाहेत.
'हरवले अाहेत ! हरवले अाहेत !! हरवले अाहेत !!! प्रभाग क्र. 33 मधील नगरसेवक हरवले अाहेत. राेडवर ड्रेनेजचे मैला पाणी... रस्त्यांची प्रचंड दुरावस्था...अपघातांची मालिका सुरु...एक सजग नागरिक असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात अाला अाहे.' गेल्या अनेक वर्षांमध्ये पुण्याची लाेकसंख्या प्रचंड वाढली अाहे. त्याचबराेबर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक अाजूबाजूच्या गावांचा समावेश करण्यात अाला अाहे. लाेकसंख्यावाढीमुळे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या अाहेत. नगरसेवक निवडणूकीच्यावेळी मतं मागायला येतात परंतु निवडून अाल्यानंतर पुढील पाच वर्षे फिरकतही नाहीत अशी तक्रार अनेकजण करत असतात. पुण्यातील प्रभाग क्रं 33 हा वडगाव धायरी-सनसिटीचा भाग अाहे. या भागात रस्त्यांची माेठ्याप्रमाणावर दुरावस्था झाली अाहे. त्याचबराेबर काही दिवसांपासून मैलापाणी रस्त्यावर येत अाहे. परंतु या समस्यांकडे येथील नगरसेवक लक्ष देत नसल्याचा अाराेप करत येथील नागरिकांनी थेट नगरसेवक हरविल्याचे फलक या भागात लावले अाहेत.
दरम्यान सततच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र अाहे. या खड्यांमुळे अनेक अपघातही हाेत अाहे. त्यामुळे लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने हे खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिक करीत अाहेत.