लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिका प्रशासनाच्या वतीने नगरसेवकांना या वेळी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. नगरसचिव कार्यालय या कार्डसाठी नगरसेवकांकडून माहिती जमा करीत आहे. बहुसंख्य नगरसेवकांनी ही माहिती जमा केली असून, लवकरच सर्व नगरसेवकांना हे कार्ड वितरित करण्यात येईल.परगावी गेल्यास किंवा मोठ्या बैठका वगैरे असल्यास नगरसेवकांना ओळखपत्र लागते. संबंधित व्यक्ती पुणे महापालिकेची सन्माननीय नगरसेवक आहे, अशी ओळख हे कार्ड पटवून देते. महापालिकेच्या वतीने असे ओळखपत्र देण्यात येत असते. या वेळी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने हे कार्डही स्मार्ट करण्यात येणार आहे. कार्डवर नगरसेवकाचे छायाचित्र, नाव, पत्ता, जन्मतारीख अशी नेहमीची माहिती असेलच. शिवाय, त्यांचा आधार कार्ड क्रमांक, फोन क्रमांक याचाही समावेश त्यात असणार आहे. प्लॅस्टिक कोटिंग असलेले हे कार्ड अर्थातच रंगीत असणार आहे. दरम्यान, कार्ड स्मार्ट झाले, तरी नगरसेवकांची सर्वसाधारण सभेतील हजेरी मात्र अद्यापही हजेरीपुस्तकावर स्वाक्षरी करूनच घेण्यात येत आहे. थम्ब इंप्रेशन या आधुनिक पद्धतीने ही हजेरी घेतली जावी, यासाठी महापालिकेने एका कंपनीला मागील पंचवार्षिकच्या सुरूवातीलाच काम दिले होते. या पद्धतीने हजेरी घेण्यासाठी संबंधिताच्या बोटाचा ठसा यंत्रांमध्ये रजिस्टर करावा लागतो. तत्कालीन नगरसेवकांपैकी फारच थोड्या नगरसेवकांनी याला प्रतिसाद दिला. याहीवेळी नगरसेवक अशी माहिती नोंद करून घेण्यासाठी फारसे उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे अजूनही तरी स्वाक्षरी करूनच ते सर्वसाधारण सभेला हजेरी लावत आहेत.
नगरसेवकांना मिळणार स्मार्ट कार्ड
By admin | Published: May 07, 2017 3:22 AM