पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असताना पुणे जिल्ह्यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार असल्याने या व पालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा धसका इच्छुक आणि विशेषत: नगरसेवकांमध्ये असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नेत्यांच्या तारखा मिळवून विकासकामांची उद्घाटने करण्याची लगीनघाई सध्या सुरू आहे.शहराच्या विविध भागांत गेल्या काही वर्षांमध्ये पूल, उद्याने, मैलापाणी शुद्धीकरण यंत्रणा, जलशुद्धीकरण केंद्रे, स्वागत कमानी आदी कामे करण्यात आली. या सुविधांचा वापरही नागरिकांनी सुरू केला आहे. निवडणुकांपूर्वी या विकासकामांची उद्घाटने करण्याची, नव्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याची पालिकेतील सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांचीही पद्धत आहे. महानगरपालिकेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर होऊन उमेदवारांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. पुण्यातून विधान परिषदेवर निवडून गेलेले अनिल भोसले यांची आमदारकीची मुदत जुलै महिन्यात संपली. ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदान होईल त्याआधी ४५ दिवस आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. ४५ दिवसांची ही मुदत ३५ दिवसांवर येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तथापि, त्याबाबतचा अध्यादेश अद्याप काढला गेलेला नाही.निवडणूक प्रक्रियेतील, आचारसंहितेतील बारकावे माहिती नसल्याने काही नगरसेवकांमध्ये येऊ घातलेल्या दोन आचारसंहितांबाबत धास्ती असल्याचे दिसून येते. दरम्यान, महानगरपालिका व विधान परिषदेच्या आचारसंहितेचा धसका विशेषत: विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. आपापल्या भागात केलेल्या विकासकामांची उद्घाटने करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रादेशिक पातळीवरील नेत्यांच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत. विकासकामांच्या ठिकाणी रंगसफेदी व डागडुजी सुरू झाली आहे.(प्रतिनिधी)महानगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यानच विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लोकप्रतिनिधींची पंचाईत झाली होती. मात्र सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केल्यानंतर आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार यांना आचारसंहितेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेबद्दल सध्या काही सांगता येणार नाही. मात्र डिसेंबरमध्ये ती लागू होण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांना धसका दोन आचारसंहितांचा
By admin | Published: October 16, 2016 4:25 AM