- दीपक जाधव, पुणे
महापालिकेच्या वतीने आजी-माजी नगरसेवकांच्या ६ वर्षांतील अडीच हजार बिलांवर तब्बल ८७ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. त्याचवेळी सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या शहरी गरीब योजनेंतर्गत सादर झालेल्या ३२ हजार बिलांवर केवळ ७१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक व नगरसेवकांच्या बिल आणि खर्चाच्या रकमेची तुलना केली असता त्यामध्ये तब्बल ४०० पटीचा फरक असल्याची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे.महापालिकेच्या वतीने आजी-माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च केला जातो. त्याचबरोबर शहरी गरीब योजनेंतर्गत अल्पउत्पन्न गटातील नागरिकांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्चही महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र काही नगरसेवक रुग्णालयांच्या संगनमताने वैद्यकीय उपचाराची प्रचंड फुगवलेली बिले सादर करून पालिकेची लूट करीत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आजी-माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांवर २०१० ते २०१६ पर्यंत झालेल्या खर्चाची आकडेवारी अजहर खान यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविली आहे. त्यातून हा प्रकार उजेडात आला आहे. काही आजी-माजी नगरसेवक सातत्याने आजारी पडत असून, त्यांच्या वैद्यकीय उपचारांवर पालिकेला मोठा खर्च करावा लागला असल्याचे दिसून येत आहे. माजी नगरसेवकांचे आजारपणांवरील खर्च हा सर्वाधिक थक्क करणारा आहे. माजी नगरसेवकांकडून आजारपणावर ६ वर्षांत ७९ कोटी रुपयांचा खर्च पालिकेला करावा लागला आहे. त्यांच्याकडून केवळ ६७३ वैद्यकीय उपचाराची बिले सादर करण्यात आली आहेत. सध्या कार्यरत असलेल्या आजी नगरसेवकांनी १९६७ बिले सादर केली त्यावर ८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या तुलनेत शहरी गरीब योजनेतील नागरिकांकडून ३२ हजार ४३९ बिले सादर करण्यात आली, त्यावर केवळ ७१ कोटी रुपये पालिकेचा खर्च झाला आहे. सर्वसामान्य नागरिक व नगरसेवक यांच्या आजारपणावरील बिल व त्यावर झालेला खर्च याची तुलना केली असता त्यामध्ये चारशे पट फरक दिसून येत आहे.काही आजी-माजी नगरसेवकांकडून वैद्यकीय सहाय्य योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. बोगस बिले सादर करणे, नातेवाईक, मित्र यांनी घेतलेले उपचार स्वत:च्या नावावर दाखविणे असे प्रकार यामध्ये घडल्याचे दिसून येत आहेत. शहरी गरीब योजनेसाठी निधी अपुरा पडत असताना आजी-माजी नगरसेवकांसाठी मात्र दरवर्षी घसघशीत तरतूद केली जात आहे. कमी पडल्यास वर्गीकरण करून पैसे उपलब्ध केले जातात. काही माननीयच पडतायत सातत्याने आजारी : खर्च लाखावरआजी-माजी नगरसेवकांनी सादर केलेल्या बिलांची यादी पाहिली असता, काही माननीयच सातत्याने आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे. काही जणांनी वर्षात ४-४ वेळा आजारी पडून त्याचे पैसे घेतले आहेत. त्याचबरोबर त्यांचे आजार इतके मोठे आहेत, की हॉस्पिटलचे बिलाचे आकडे लाखांच्या पुढेच गेले आहेत. काही नगरसेवकांनी मात्र या योजनेचा बिल्कुल लाभ घेतलेला नाही.बरीच माहिती लपविलीआरोग्य विभागाने नगरसेवकांच्या आजारपणावरील खर्चाची माहिती देताना काही ठिकाणी कॉलम रिकामे ठेवले आहेत. नगरसेवकांनी कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले त्याचे कॉलम बऱ्याच ठिकाणी रिकामे ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाकडून अपिलानंतर दिलेली माहितीही अर्धवटच आहे.माजी नगरसेवकांकडून आजारपणावर ६ वर्षांत ७९ कोटी रुपयांचा खर्च पालिकेला करावा लागला आहे. त्यांच्याकडून केवळ ६७३ वैद्यकीय उपचाराची बिले सादर करण्यात आली आहेत. खर्चाची सर्व माहिती संकेतस्थळावर टाकामहापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितल्यानंतर सुरुवातीला त्यांनी ती दिली नाही. त्यानंतर अपिलात गेल्यानंतर त्यांनी माहिती दिली आहे. प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. नगरसेवकांच्या आजारपण व त्यावर झालेल्या सर्व खर्चाची माहिती नागरिकांना संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी’’ - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच