पुणे : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून विविध भागांत अतिक्रमण कारवाई सुरू झाली आहे. परंतु याविरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविका राजश्री काळे यांनी दुपारी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यालयात जाऊन आकांडतांडव केले. पालिकेकडून ठराविक लोकांवरच नेहमी कारवाई केली जाते. हातावर पोट असलेल्या पारधी समाजातील कुटुंबांचे साहित्य जप्त केले. पालिकेने ही कारवाई त्वरित थांबवावी व रस्त्यांवर राहणाऱ्या पारधी कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करीत राजेंद्र निंबाळकर यांना धारेवर धरले.
अतिक्रमणविरोधी मोहिमेत पुणे स्टेशनकडून बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाकडे येणाºया रस्त्याच्या पदपथांवर गेल्या अनेक दिवसांपासून वास्तवास राहणाºया पारधी समाजातील कुटुंबातील झोपड्यांवर कारवाई केली. त्यांचे साहित्य जप्त केले. या कारवाईनंतर नगरसेविका काळे यांनी निंबाळकर यांच्या कार्यालयात जाऊन कारवाई झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिकेची आहे. त्यांना एसआरए योजनेत घरे द्यावेत. त्यांचे जप्त केलेले साहित्य परत करावे, अशी मागणी केली. मात्र, हा कायदेशीर मार्ग नसल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. त्यावर काळे यांनी आक्रमक रुप धारण केले. तुम्ही येथे कसे बसलात, तुमचं काम काय आहे, असे थेट एकेरी भाषेत त्यांनी निंबाळकर यांच्यावर आरडाओरड केली. यावेळी त्यांना रडू कोसळले. अतिक्रमण कारवाईत अधिकाºयांनी संबंधित कुटुंबातील सदस्यांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.
काळे यांच्या रुद्रावतारानंतर अखेर नगरसेवक दीपक पोटे आणि राहुल भंडारे यांनी निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जप्त केलेले साहित्य परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काळे शांत झाल्या.