पुणे : सिरम इन्स्टिट्युटला लागलेली आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस वरच्या मजल्यावर गेले. तेव्हा त्यांना तेथे पाच जणांचे मृतदेह आढळून आले. जगण्याची अखेरची तडफड सांगणारे हे मृतदेह असल्याचे अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीसांना आढळून आले आणि त्यांच्या काळजात धस्स झाले.
मृतदेह संपूर्ण काळवंडलेले होते. अंगावरील कपडे बहुतांशी जळाले होते. त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या अवस्थेत होते. काही जण आपले तोंड, पाय खाली मुडपून बसलेले होते. तर काही जणांचे हात हवेत तसेच अधांतरी दिसत होते. त्यांच्या या अवस्थेवरुन त्यांनी जगण्यासाठी केलेली तडफड जाणवली.
आग विझविण्यासाठी पाण्याचा मोठा मारा करण्यात आल्याने हे पाणी पायऱ्यांवरून वाहत होते. सर्वत्र आगीत जळून गेलेल्या वस्तू पडल्या होत्या. त्यातून अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मृतदेह त्याच अवस्थेत उचलून खाली आणले. हे दृश्य अजूनही आमच्या डोळ्यासमोरुन हालत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींबाबत पवार बरोबर की पोलिस?
सिरम इन्स्टिट्युटला भेट देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी त्यांनी आत्ता आग लागलेल्या इमारतीला भेट दिली होती, असे अजित पवार यांनी गुरुवारी (दि. २१) घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले होते. त्याहीवेळी संबंधित इमारतीत मशिनरी बसविण्याची व इतर कामे सुरु होती. मोदी यांच्या भेटीच्या आधी काही दिवस येथील काम थांबवण्यात आले. पंतप्रधान जेथे भेट देणार होते त्या इमारतीच्या फायर ऑडिटपासून सुरक्षेची सर्व तपासणी करण्यात आली होती. पण शुक्रवारी मोदी यांनी या इमारतीला भेटच दिली नव्हती, असे सांगण्यात आले. त्यामुळे पवारांची माहिती बरोबर की पोलिसांची असा प्रश्न निर्माण झाला आहे.