महिला वर्गाकडून स्वत:चे व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यासाठी कॉस्मेटिक वस्तूंच्या खरेदीसह ब्युटी पार्लरला महिन्यातून तीन ते चार वेळा भेट दिली जाते. नोकरी निमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांकडून सुंदर दिसण्यासाठी मेकअपवर अधिक भर दिला जातो. मात्र, सध्या पार्लर आणि कॉस्मेटिक दुकाने बंद असल्याने महिलांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यावर काही महिलांनी पार्लरमधील मुलींकडून घरगुती सेवा घेणे सुरू केले आहे. तर काही महिलांच्या मते चेहऱ्याला मास्कच घालून बाहेर पडायचे असल्याने आमचा चेहरा बघणार तरी कोण? असे म्हणत मेकअपला रामराम केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------
आता कुठेतरी कामाला गती मिळाली होती. पण पुन्हा ‘जैसे थे’ अशी अवस्था झाली आहे. आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. त्यातच एप्रिल आणि मे या लग्नाच्या हंगामातील कामेही रद्द झाली आहेत. हे खूप मोठे संकट ओढवले आहे. यातून मार्ग कसा काढायचा हेच कळत नाहीये. जगणच अवघड होऊन बसले आहे. किमान सोमवार ते गुरूवार पार्लर थोड्यावेळ का होईना सुरू करण्याची परवानगी मिळावी.
शुभांगी पानसरे, संचालिका ब्युटी पार्लर
-------------------------------------------------------------------------------------------------------
टाळेबंदी काहीशी शिथिल झाल्यानंतर ब्युटी पार्लर सुरू केले. पण महिलांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली. चेहऱ्याशी थेट संपर्क येत असल्यामुळे महिला पार्लरमध्ये यायला घाबरत आहेत. पण बऱ्याच महिला घरी बोलावून अनेक गोष्टी करून घेत असल्याने पार्लरचा व्यवसाय पूर्णत: बंद होण्याच्या मार्गावर आहे. मी देखील पार्लर भाड्याने देण्याचा विचार करीत आहे. कोरोनामुळे कॉस्मेटिक चा व्यवसाय सुद्धा थंडावला आहे.
मंदाकिनी गजरे, ब्युटी पार्लर मालक
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमचे 20 ते 25 ब्युटी पार्लरशी टायअप आहे. मात्र कोरोना काळात जेमतेम एकाच पार्लरची ऑर्डर मिळत होती. सध्या पार्लर बंद आहेत. त्यामुळे महिना 10 ते 12 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सात आठ महिन्यांपासून दुकान बंद ठेवून होम डिलिव्हरी करत होतो. मात्र आता तेही बंद झाले आहे. महिलांची बहुतांश मागणी ही मेंहदी आणि कलर ला अधिक असते. आमच्याकडे सध्या कॉस्मेटिकच्या कोणत्याही वस्तूंचा साठा नाही.
कॉस्मेटिक विक्रेता
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
चेहरा सुंदर आणि व्यक्तिमत्व आकर्षक ठेवण्यासाठी पार्लर मध्ये जाणं ही प्रत्येक महिलेची गरज बनली आहे. मी महिन्यातून चार ते पाच वेळा पार्लरमध्ये जातेच. सध्या पार्लर बंद आहेत आणि कुठं फारसं बाहेर पडायचं नसल्याने घरच्या घरीच नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदीच गरज भासली तर सकाळच्या वेळेत पार्लरमधील काही मुली घरी येऊन सेवा देतात.
- अमृता देशपांडे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------