मंचर : पावसाने ओढ दिल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. विशेषत: मेथी व कोथिंबिरीची टंचाई निर्माण झाल्याने बाजारभाव कडाडले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीची एक जुडी तब्बल ७0 रुपयांना विकली गेली. यावर्षीचा हा उच्चांकी भाव आहे.पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. बहुतेक ठिकाणचे पाणीसाठे संपले आहेत. त्यामुळे नगदी पिकाचे उत्पादन घेणे शक्य नाही. कमी खर्चात व कमी दिवसांत येणारे पीक अशी मेथी, कोथिंबिरीची ओळख आहे. मात्र मागील महिन्यापासून पाण्याअभावी मेथी, कोथिंबिरीचे पीक शेतकऱ्यांना घेता आलेले नाही. त्यामुळे आवक घटली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी केवळ ६ हजार कोथिंबीर जुड्यांची आवक झाली. सर्वाधिक ७ हजार रुपये शेकडा असा भाव मिळाला. म्हणजेच एक जुडी ७0 रुपयांना विकली गेली. मेथीच्या जुडीला ३२ रुपये भाव मिळाला आहे. पाऊस लवकर सुरू झाला नाही तर कोथिंबीर १00 रुपयांचा टप्पा पार करेल, असे विक्रेते संदीप गांजाळे यांनी सांगितले.
पावसाने दडी मारल्यामुळे कोथिंबिरीची जुडी तब्बल ७0 रुपयांना!
By admin | Published: June 18, 2016 3:32 AM