पुणे : आजपासून पाच वर्षांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीचवर सायबर हल्ला करून सायबर चोरट्यांनी तब्बल कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचा प्रकार घडला होता. दिवस होता ११ ऑगस्ट २०१८... पहिल्या हल्ल्यात, चोरी केलेल्या एटीएम कार्डचा वापर करून २८ देशांमधील व्यवहारांद्वारे अंदाजे ८० कोटी ५० लाख रुपये काढले गेले होते. त्यानंतर दुसऱ्या हल्ल्यात १३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळच्या सुमारास स्वीफ्ट ट्रान्झॅक्शन करून हॅन्गसेट बँक, हाँगकाँग या बँकेतील एका खासगी कंपनीच्या खात्यातून एकूण १३ कोटी ९२ लाख काढून घेतले होते, अशा फक्त दोनच दिवसांत एकूण ९४ लाख कोटी ४२ लाख रुपये काढून बँकेची फसवणूक करण्यात आली होती.
कोट्यवधी रुपयांचा सायबर हल्ला... क्लोन कार्डचा वापर करून भारताबाहेरचे ट्रान्झॅक्शन... अशा प्रकरणातील आरोपीचा शोध लावायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाल्याने सायबर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यावेळी जयराम पायगुडे हे सायबर पोलिस निरीक्षक होते. त्यांनी या गुन्ह्याचा तपास आपल्या हातात घेऊन सूत्रे फिरवायला सुरुवात केली. सर्वांत आधी प्राथमिक माहिती घेऊन हा प्रकार नेमका कुठे घडला? याचा तपास सुरू केला.
...असा झाला तपास
- भारतामध्ये आणि भारताबाहेर एकूण २ हजार ८४९ ट्रान्झॅक्शन्स झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात पुढे भारतातील कोल्हापूर, मुंबई, अजमेर, पनवेल, बंगळुरू या शहरातून रक्कम काढण्यात आल्याचे समजले.
- त्यानंतर या ठिकाणच्या एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगवेगळी पथक नेमून त्या - त्या शहरात पाठवण्यात आली. सर्वांत जास्त रक्कम ही कोल्हापूरमधून काढण्यात आल्याचे समजले.
- कोल्हापूरमध्ये सायबर पथक पाठवून तेथील एटीएम सेंटर आणि आजुबाजुच्या परिसरात चौकशी केली.
- अखेर सायबर हल्ला घडल्याच्या ३०व्या दिवशी पहिल्या सहा आरोपींना शोधण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले. त्यांची चौकशी केल्यावर एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आले. या आरोपींची झडती घेतली असता दुबईमधील सुमेर शेख हा त्यांचा म्होरक्या असल्याचे समोर आले.
असा घडला गुन्हा
गुन्हा घडण्यापूर्वी सहा महिने अगाेदरच सायबर हल्लेखोरांनी कॉसमॉस बँकेचे बँकिंग नेटवर्क आणि स्वीप्ट नेटवर्कमध्ये कॉम्प्रमाइज केले होते. सर्व्हर कॉम्प्रमाइज झाल्यावर हल्लेखोरांनी कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांचा एटीएम कार्डचा डेटा चोरला आणि तो डेटा जगभरातील ३० देशांमध्ये त्यांचे नेटवर्क चालवणाऱ्या दुसऱ्या टोळीपर्यंत पोहोचवला.
दुसऱ्या टोळीने मिळालेल्या एटीएम कार्ड डेटाद्वारे क्लोन कार्ड तयार केले आणि पुढे दुसऱ्या टोळ्यांपर्यंत ते पोहोचवले. या काळात कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हल्लेखोरांच्या नियंत्रणातच होते. क्लोन केलेले सर्व कार्ड हे अखेरच्या आरोपीपर्यंत पोहोचल्याची खात्री झाल्यावर ११ ऑगस्ट २०१८ रोजी प्रत्यक्ष एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याआधी कॉसमॉस बँकेचे एटीएम सर्व्हर नियंत्रणात घेतले.
त्यानंतर भारतासह देशातील शेकडो आरोपींनी मिळून १३ हजार ८४९ ट्रान्झॅक्शन करून ८० कोटी ५० लाख रुपये विड्रॉल केले. त्यानंतर दोन दिवसांनी १३ ऑगस्ट २०१८ रोजी स्वीफ्ट ट्रान्झॅक्शन करून पुन्हा १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँग येथे वळविले.