पुणे : लाखो प्रवाशांची दररोज ने-आण करणाऱ्या पीएमपीमध्ये दिवसाला सरासरी १६० प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यांच्याकडून दररोज १६ हजारांचा दंड वसूल केला जातो; मात्र या वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या पथकाचा खर्चच दरदिवशी जवळपास २० हजार रुपये असल्याचे तथ्य समोर आले आहे. त्यामुळे या पथकाच्या गेल्या सहा महिन्यांतील कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएमपीतून दररोज लाखो प्रवासी शहरात ये-जा करतात. यात पासधारक; तसेच तात्पुरत्या प्रवासासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांच्या तुलनेत पीएमपी बसची संख्या कमी असल्याने जवळपास सर्वच बस सकाळी आणि सायंकाळी गर्दीने भरलेल्या असतात, नेमका याचाच फायदा घेत शेकडो प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. त्यात प्रामुख्याने दरवाजाला लटकून एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपपर्यंत, तर अनेकदा गर्दीत उतरण्याच्या दरवाजात पुढे जाऊन वाहक जवळ येताच खाली उतरणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीएमपीकडून नेमण्यात आलेल्या तपासणी पथकांनी गेल्या आठ महिन्यांत सुमारे ३९ हजार २०० प्रवाशांवर कारवाई करून ३९ लाख २ हजार ७०० रुपयांची वसुली केलेली आहे. पथकांकडून विना- तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १०० रुपये, तर पासचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशाकडून १५० रुपयांचा दंड वसूल केला जातो.> पथकावर २० हजार खर्च तिकीट तपासणीसाठी प्रशासनाकडून ८ पथके नेमण्यात आलेली आहे. या प्रत्येक पथकात सुमारे ४ कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांचे सरासरी दरदिवशीचे वेतन आणि त्यांना दिला जाणारा प्रवास खर्च; तसेच इतर भत्ते पाहता, या पथकाचा प्रतिदिन खर्च जवळपास २० ते २२ हजार रुपयांचा आहे. त्यामुळे या पथकांकडून अपेक्षित काम होत नाही.
खर्च २० हजारांचा, वसुली १६ हजार
By admin | Published: December 11, 2015 1:03 AM