पुणे : पोहण्याची स्टंटबाजी करुन पाच तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची घटना जयंतराव टिळक पूलावर घडली. या पूलावरुन मुठा नदीत पाच तरुणांनी उड्या घेतल्या. मात्र त्यापैकी चार जण पाण्याबाहेर आले असून अद्याप एकाचा शोध सुरु आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम अग्निशामक दलाने केले. त्यानंतर त्यांना प्रत्येक एक तासाला परिसरात बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याची सूचना अग्निशामक दलाला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील या तरुणांनी अशाच प्रकारची स्टंटबाजी करुन आपला जीव धोक्यात घातला होता. मुठा नदीत उडी मारलेल्या पाच मित्रांपैकी निखिल गौतम थोरात (वय २०, रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) हा युवक बेपत्ता झाला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोेंद केली असून युवकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल व त्याचे इतर चार मित्र दुपारी अडीचच्या सुमारास मुठा नदीत पोहण्यासाठी महापालिकेसमोरील जयंतराव टिळक पुलावर आले होते. पाचही मित्रांनी पुलावरून नदीत उडी मारली. त्यातून चौघे जण बाहेर आले. मात्र निखिल बाहेर आलाच नाही. गेल्या काही दिवसांपासून जोरदार झालेल्या पावसाने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. सोडलेल्या पाण्याचा वेग प्रचंड आहे. ााण्याचा वेग मोठ्या प्रमाणात आहे. उडी मारल्यानंतर पोहत पोहून चौघे मित्र बाहेर आले; मात्र बराच वेळ निखिल बाहेर आला नाही. तो दिसत नसल्याने मित्र घाबरले. हा परिसर गजबजलेला असल्याने नागरिकांनाही हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ अग्ग्निशामक दल व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शिवाजीनगर पोलिस व कसबा अग्ग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने निखिलचा शोध सुरू झाला. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण झाले. रात्री आठ वाजेपर्यंत निखिलचा शोध लागला नव्हता. पोलिसांनी एनडीआरएफला याची माहिती दिली आहे. एनडीआरएफ रविवारी दाखल होण्याची शक्यता आहे. निखिल हा कामगार पुतळा परिसरात राहतो. त्याची आई साफसफाईचे काम करते. तर, निखिल हा एका वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. निखिल गेल्या वर्षीही मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर पोहण्यासाठी आला होता.
पाचही तरुणांना नदीत उडी मारुन स्टंटबाजी करायची होती. त्यांनी मागील वर्षी देखील अशाच प्रकारची स्टंटबाजी केल्याचे टिळक पूलावर उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सांगितली. पाण्यात उडी मारल्यानंतर चौघे जण पोहत पाण्याबाहेर पडले. त्यावेळी ते घाबरलेले होते. घटनास्थळी जीवरक्षक पथक, पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.- बाळासाहेब कोपनार, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे