पुणे : शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णाला देण्यात आलेल्या सूपमध्ये कापसाचा बोळा आढळला. जहांगीर रुग्णालयात ही घटना घडली. रुग्णाच्या नातेवाईकांनी यासगळ्या प्रकाराचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुग्णालयाच्या उपहारगृहात हे सूप बनवण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी जहांगीर रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला सूप देण्यात आले होते. सुप पिताना रुग्णालया त्यामध्ये कापसाचा बोळा आढळला. त्याने तातडीने ही बाब शेजारी असलेल्या नातेवाईकाच्या निदर्शनास आणून दिली. नातेवाईकाने याचे मोबाईलवर शुटींग करुन प्रशासनाला सांगितला. यानंतर शनिवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुग्णाच्या नातेवाईकाने याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने रुग्णाचा जबाब घेण्यात येईल. यानंतरच रुग्णालयाविरुध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांनी सांगितले. एकीकडे सुसज्ज यंत्रणा व सुविधांनी युक्त अशा प्रकारचा गवगवा करुन त्याच्या नावाखाली रुग्णांकडून भरमसाठ पैसे आकारले जातात. दुस-या बाजुला मात्र रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा व्यवस्थितरीत्या पुरविण्यास रुग्णालय प्रशासन अपयशी ठरताना दिसून आले आहे. तसेच या घटनेच्या निमित्ताने रुग्णालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाच्या उपहारगृहांमधून दिल्या जाणा-या पदार्थांचा दर्जा, त्या उपहारगृहाची स्वच्छता यांची तपासणी होते किंवा नाही याकडे देखील या घटनेच्या निमित्ताने लक्ष वेधले जाणार आहे.
याबाबत बाेलताना जहांगीर रुग्णालयाचे संचालक जाॅर्ज एपेन म्हणाले, रुग्णाला देण्यात आलेल्या सूपमध्ये काही आढळून आले याविषयी संबंधित कर्मचाऱ्याकडे रुग्णालय प्रशासनाकडून चाैकशी करण्यात येईल. यात संबंधित व्यक्ती दाेषी आढळल्यास प्रशासनाकडून पाेलिसांना माहिती देण्यात येईल. याबराेबरच आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना याेग्य पद्धतीने प्रतिसाद दिला आहे.