भिगवण: येथील पोलीस ठाण्यात असलेल्या महिला दक्षता कमिटीच्या जवळपास नऊ बैठका झाल्या असून, अनेक महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोना काळात समितीच्या बैठका झाल्या नसल्या, तरी समितीतील सदस्यांनी गाव भेटी देत महिलांचे समुपदेशन केले. अशी माहिती महिला दक्षता समितीच्या सदस्या मीनल शिवरकर यांनी दिली.
भिगवण शहर हे आसपासच्या २० वाड्या-वस्त्या आणि ग्रामीण भागासाठी रोजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या खरेदीसाठी योग्य मानले जात आहे त्याच प्रमाणे पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलबरोबरच अनेक खासगी शिक्षण संस्थेतून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, मागील काही वर्षात भिगवण शहरात वाढत असलेली रोडरोमिओगिरी आणि गुंडगिरीमुळे अनेक मुलींना शिक्षणाला रामराम ठोकावा लागला होता. मात्र, ज्या वेळी सरकारने महिला दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले त्यावेळी पासून या प्रकारात आमुलाग्र बदल झाल्याचे पाहावयास मिळाले.
महिलांवरील अन्याय आणि त्यांना होणाऱ्या त्रासातून काही अंशी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून सुटका झाल्याचे पाहावयास मिळाले.
महिला दक्षता समितीच्या माध्यमातून ९ बैठका घेण्यात आल्या. या वेळी महिलांच्या प्रश्नावर उपाय योजना करीत काही ठिकाणी समुपदेशन करण्यात आले. भिगवण येथील सामाजिक सेविका डॉ. पद्मा खरड, ॲड. स्वाती गिरंजे ,दीपाली भोंगळे ,वर्षा बोगावत ,डॉ.जयश्री गांधी ,पोलीस पाटील तनुजा कुताळ असे समाजातील अनेक घटकांचा समावेश करीत ही महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
तत्कालीन पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून कामकाज केले जात होते. मात्र सध्या सुरू असणारी महामारीच्या कारणामुळे कामकाजात शिथिलता आली असली तरी महिलांच्या तक्रारीकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
दक्षता समितीच्या माध्यमातून महिला आणि शाळकरी मुलीच्या प्रश्नावर योग्य प्रकारे काम करता येत आहे. तसेच अनेक वेळा तुटलेल्या संसारात समुपदेशन करीत तडजोड करीत महिलांना न्याय मिळवून देण्यात दक्षता समितीकडून महत्त्वपूर्ण काम होत आहे.
तनुजा कुताळ, सदस्या, महिला दक्षता समिती
०७ भिगवण
संग्रहीत छायाचित्र