पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. पुणे लोकसभा मतदारात महायुतीचे उमेदवार मुरलीधर माेहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे.
पुणे लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे, ‘एमआयएम’चे अनिस सुंडके यांच्यात मुख्य लढत झाली. पुणे लाेकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीसाठी ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, मला निवडणूक निकालाची धाकधूक अजिबात नाही. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नाही. गेल्या दहा वर्षात भाजपने विकासकामे केलेली नाही. जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे जनता भाजपवर नाराज आहेत. पुणेकर नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. मी विजयी होणार आहे. जेजुरीला जाऊन मल्हार मार्तंड खंडोबारायाचे दर्शन घेऊन आलेलो आहे.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, धाकधूक नाही, निकालाविषयी आत्मविश्वास आहे. पुणेकरांचा आशीर्वाद मला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात पुणे शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती. या सत्तेच्या काळात भाजपने कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे केली आहेत. मेट्रो, नदीसुधार, समान पाणी पुरवठा योजना यांसह विविध योजना राबविला असून त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. या विकास कामाच्या जोरावर मला विजयाची पूर्ण खात्री आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे म्हणाले, मनसेत येण्यापूर्वी मी शून्यातून उभा राहिलो आहे. मनसे सोडल्यानंतर मी वंचितकडून निवडणूक लढवत आहे. माझ्याकडे गमविण्यासारखे काही नाही. मला निवडणुकीच्या निकालाचे टेन्शन नाही. मी पुण्याचा खासदार होणार आहे. माझे काम सुरू आहे. जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवित आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहे. त्यामुळे मला जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे.