पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहे. कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले असून, कोणी काय काम करायचे, कोणती जबाबदारी पेलायची याची रंगीत तालीमसुद्धा घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर विधानसभा मतदारसंघनिहाय ८४, तर पोस्टल मते ६ अशा ९० टेबलवर मतमोजणी होणार आहे. बालेवाडी क्रीडासंकुलात मतमोजणीसाठी सात कक्ष तयार केले आहेत. विधानसभानिहाय मतदान केंद्राच्या संख्येनुसार मतमोजणीच्या २६ फेर्या होतील. सकाळी आठला मोजणी सुरू होईल. दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी १४ यंत्राप्रमाणे एका फेरीत ८४ यंत्रांवरील मते मोजली जाणार आहेत. एक हजारहून अधिक पोस्टल मते निवडणूक शाखेकडे जमा झाली आहेत. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत आलेल्या पोस्टल मतांची मोजणी पहिल्यांदा होईल. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र ६ टेबल उपलब्ध करून दिले आहेत. एका फेरीला २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सुरुवातीच्या फेरीला जादा वेळ लागण्याची शक्यता आहे. पहिली फेरी ९ पर्यंत पूर्ण होईल. १९ उमेदवार आणि २० व्या क्रमांकावर नकारात्मक मत देण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक यंत्रावर १९ वेळा ‘बीप’ वाजल्यानंतर पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. एखाद्याने अथवा प्रतिनिधीने आक्षेप घेतल्यास मतमोजणीचा कालावधी वाढेल. (प्रतिनिधी)
मतमोजणीची यंत्रणा सज्ज
By admin | Published: May 15, 2014 5:05 AM