लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : नियोजित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी महारेल कडून सुरु असलेल्या भूसंपादन पूर्व मोजणीस अनेक गावातून शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून मोजणी अधिकाऱ्यास पिटाळून लावल्याचे काही घटना घडलेल्या आहेत. मात्र यासाठी नारायणगाव हे गाव अपवाद ठरले आहे. नारायणगाव येथील शेतकऱ्यांनी मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले तर मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देवून स्वागत केले. एखाद्या गावातून स्वागत होत असल्याचा सुखद प्रकार अनुभवयास मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
रस्ता असो किवा विमान तळ असो किवा रिंग रोड असो अथवा अन्य शासकीय योजना असो यासाठी जमीन मोजणीस, भूसंपादनास आलेल्या अधिकाऱ्र्यांना अनेक ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. वेळप्रसंगी आंदोलने ही केली. मात्र नारायणगाव येथील शेतकऱ्यांनी आपला दिलदारपणा दाखवून आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विदेश संचार निगम, पाच धरण, कालवे, जीएमआरटी खोडद येथील जागतिक दर्जाची रेडीओ दुर्बीण, बाह्यवळण शासकीय योजनासाठी हजारो एकर जमिनी दिलेल्या आहेत. या प्रकल्पामुळे अनेक जण भूमिहीन झाले तर शेकडो शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. आता पुन्हा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी महारेल कडून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी मोजणी सुरु झाली आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या मोजणीसाठी सोमवारी नारायणगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, महसूल विभाग आणि महारेलचे कर्मचारी-धिकारी आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले तर अधिकाऱ्यांनी देखील बाधित शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शेतकरी विकास तोडकरी यांच्या हस्ते नारळ वाढवून मोजणीस प्रारंभ करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात मोजणी पार पडली.
याप्रसंगी स्थानिक शेतकरी विकास तोडकरी, मारुती अडसरे, किरण भुजबळ, उत्तम अडसरे, अक्षय शेटे हे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार हनमंत कोळेकर, मंडलाधिकारी डी. बी. काळे, तलाठी एन. बी. सोनवणे, विद्या नांगरे, नायब तहसीलदार सी. ए. भोर, महारेलचे व्यवस्थापक मंदार विचारे, कृषी अधिकारी बनकर वनविभागाच्या मनीषा काळे, सार्वजनिक विभागाचे वर्पे , हिंगे आदी अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ – १ ) पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी महारेल कडून सुरु असलेल्या मोजणी प्रसंगी शेतकऱ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करताना मोजणी अधिकारी .
२ ) पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी महारेल कडून सुरु असलेल्या मोजणी प्रसंगी शेतकरी विकास तोडकरी यांच्या हस्ते नारळ वाढवून मोजणी करण्यात आली .