पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक साठी यंदा तिरंगी लढत होत आहे. यात भाजपचे संग्राम देशमुख , महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात चुरशीची सामना रंगणार आहे. या तीनही उमेदवारांनी जोरदार प्रचार करत एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
पुण्यातील बालेवाडी येथे गुरुवारी सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत.
पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघात 4 लाख 26 हजार 257 मतदारांपैकी 2 लाख 47 हजार 50 ( 57.96 टक्के ) मतदारांनी मतदान केले,तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदारांपैकी 52 हजार 987 म्हणजे 73.04 टक्के मतदारांनी मतदान केले आहे.
......
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यास दुपारी तीन वाजण्याची शक्यता
एकूण मतदानाची वाढलेली टक्केवारी, एकूण उमेदवारांची संख्या यामुळे पाचही जिल्ह्याची मतपत्रिका एकत्र करणे, त्यातून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे,त्यानंतर पहिल्या पसंती क्रमांकात निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यासाठी गुरूवारी (दि.3) दुपारी तीन वाजण्याची शक्यता आहे. ........
निकालाला लागू शकतो विलंब...
पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण न केल्यास उलट्या क्रमांने पसंतची मते मोजावी लागतील व मतदानाची प्रक्रिया खूपच लांबून अंतिम निकाला हाती येण्यासाठी शुक्रवारचे पाच वाजतील अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी सांगितले.
बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी करण्यात आली होती. पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल लावले आहेत. मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी 6 हॉल आहेत. पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक करण्यात आली. 'शिक्षक मतदार'साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती करण्यात आली. सुरक्षेसाठी ४५० पोलिस आहेत.-------
अशी घेतली जातेय काळजी..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व निवडणूक प्रशासन यांच्याकडून आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, फेसशिल्ड आदी साहित्याचा समावेश असलेले किट देण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.