लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासूनचा बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी १४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील सुमारे ५७५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणीला सुरूवात झाली आहे. या मोजणीला काही गावांमध्ये विरोध होत असला तरी मोजणीला वेग आला असून, हा मार्ग लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन कराव्या लागणाऱ्या पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील १४७० हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हवेली आणि खेड तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील सुमारे ५७५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ही जमीन थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यानंतर जागेची किंमत निश्चित केली जाईल. यासाठी गेल्या तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार व त्यानुसार खुल्या बाजारातील दर व जास्तीत जास्त किंमत निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे यांनी सांगितले.