राजगुरूनगर : होऊ घातलेल्या पुणे-नाशिक रेल्वेच्या मार्गिकामुळे होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी या परिसरातील शेतकरी भूमिहीन होऊन देशोधडीला लागणार आहे. शासनाने जमिनीला ५० लाख रुपये गुंठ्याला भाव दिला तरी रेल्वे मार्गिका होऊ देणार नाही. तसेच होणाऱ्या रेल्वे मार्गाची मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून शेतकरी आंदोलनाच्या तयारीत उतरला आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गिकेसाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी नोटिसा देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. दि. १९ रोजी होलेवाडी येथे मळूआई देवीच्या मंदिरात स्थानिक शेतकऱ्यांची जमीन देण्याबाबत रेल्वे अधिकारी व खेड प्रशासनाची बैठक घेण्यात आली. या वेळी खेडचे प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, रेल्वे अधिकारी सिद्धलिंग शिरोळे, खेड मंडल अधिकारी सविता घुमटकर, तलाठी बबन लंघे, खेड बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, होलेवाडीच्या सरपंच सुरेखा होले, उपसरपंच पूनम होले व शेतकरी उपस्थित होते. प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण व रेल्वे अधिकारी यांनी शेतकऱ्यांपुढे रेल्वे मार्गिकामध्ये जाणाऱ्या जमिनीबाबत माहिती दिली. पुणे-नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार असून, या मार्गावर ताशी २२० कि. मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरांतील अंतर आता केवळ दोन तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले.
टाकळकरवाडी येथे रेल्वे जंक्शन होणार आहे. दरम्यान रेल्वेसाठी जाणाऱ्या जमिनीची मोजणी न करताच शेतकऱ्यांना थेट नोटिसा कशासाठी दिल्या. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कवडीमोल भावाने शेतजमिनी घेण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला.
या परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी जाणार आहे. जाणाऱ्या जमिनीला किती भाव देणार, कसा देणार, याबाबत अधिकाऱ्यांपुढे शेतकऱ्यांनी प्रश्नाचा भडिमार केला. प्रांत विक्रांत चव्हाण यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊन घेत प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नाचा भडिमार होताच प्रशासनाला बैठक उरकती घ्यावी लागली. होलेवाडी, मांजरेवाडी टाकळकरवाडी या परिसरातील शेतकऱ्यांना तुटपुंजी जमीन आहे. त्यातच रेल्वे मार्ग जाणार असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांचा शेताच्या मध्यभागातून रेल्वे मार्गिका जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे. पिढ्यानपिढया वाडवडिलांनी जोपसलेली शेतजमीन रेल्वेसाठी जात असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (दि. २४ ) रोजी होणारी रेल्वे मार्गिकेची मोजणी होऊ देणार नाही असा आक्रमक प्रवित्रा घेत या भागातून रेल्वे मार्ग जाऊ देणार नाही, यासाठी अंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असे शेतकरी नवनाथ होले, जयसिंग मांजरे, अनुप टाकळकर, अरुण मांजरे, भगवान मांंजरे, नितीन होले, गणेश मांजरे यांच्यासह मांजरेवाडी व होलेवाडी येथील शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले.
या परिसरात शेतकऱ्यांना शेतजमीन कमी आहे. प्रशासनाने मात्र हा रेल्वे मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून काढला आहे. चिंतेने गरीब शेतकरी हतबल झाला आहे. जरेवाडी, टाकळकरवाडी, होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी येथील भूमिपुत्रांच्या रेल्वेच्या मार्गासाठी जमिनी जाणार आहे. रेल्वेचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर स्वार झाले असून रेल्वेमार्गिकेची मोजणी करू देणार नाही. तसेच यापुढे शेतकरी आंदोलन दिशा ठरविणार आहे.
नवनाथ होले, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड
या पूर्वी शिरूर तालुक्यातील पाबळ, मलठण, या ठिकाणाहून पुणे-नाशिक रेल्वमार्ग जाणार होता. त्याचे सर्वेक्षणही झाले होते; मात्र होलेवाडी, मांजरेवाडी येथील बागायती शेतीतून रेल्वेचे सर्वेक्षण केले. प्रशासनाने जमीन ताब्यात घेण्यास सुरुवात करणार आहे. रेल्वे बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. प्रशासनाने ५० लाख रुपये गुंठा दिला तरी रेल्वे मार्ग शेतकरी होऊ देणार नाही. या परिसरातील रेल्वे मार्ग प्रशासनाने बदलावा; अन्यथा शेतकरी आंदोलन करून प्रशासनास रेल्वे मार्ग बदलण्यास भाग पाडू.
जयसिंग मांजरे, शेतकरी, मांजरेवाडी
............................................................
होलेवाडी, मांजरेवाडी या परिसरातील रेल्वेचे भूत हटविण्यासाठी जमलेले शेतकरी.
फोटो ओळ : शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना घेराव घालून रेल्वे मार्गाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली.