लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : बारामती व इंदापूर गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करत, शनिवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी येथे चोरून विकली जाणारी ३ लाख ३७ हजार ३९५ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा पकडला. तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एकाला ताब्यात घेतले. आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.या प्रकरणी हवालदार शंकरराव वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. बारामती विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे,फौजदार अमोल ननवरे, बारामती गुन्हे शोध पथकातील हवालदार शिवाजी निकम, हवालदार बाळासाहेब भोई, पोलीस नाईक संदीप मोकाशी, पोलीस नाईक संदीप कारंडे, पोलीस नाईक सुभाष डोईफोडे, पोलीस कर्मचारी तुषार सानप, इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक एस.वाय. जाधव, पोलीस कर्मचारी डी.आर. अर्जुन यांनी ही कारवाई केली. सविस्तर हकिकत अशी, की निमगाव केतकी गावाच्या हद्दीत निमगाव केतकी कचरवाडी रस्त्यालगत घराच्या आडोशाला एक जण दारूचा साठा बाळगून ओळखीच्या लोकांना विकत असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी बांगर यांना समजली होती. त्यांनी बारामतीचे गुन्हे शोध पथक पाठवून, कारवाई करण्याचे आदेश इंदापूरच्या पोलीस निरीक्षक भंडारे यांना दिले होते. त्यानुसार फौजदार ननवरे व इंदापूर गुन्हे शोध पथकातील कर्मचारी खासगी वाहनाने निमगाव केतकी येथे गेले. तेथे बारामतीच्या गुन्हे शोध पथकासमवेत त्यांनी संयुक्त कारवाई केली.या कारवाईत वेगवेगळ्या प्रकारच्या देशी-विदेशी दारूचे ३ लाख ३७ हजार ३९५ रुपयांचे बॉक्स मिळून आले. एक आरोपी सापडला. दोघे पळून गेले.
चोरून विकणाऱ्या देशी-विदेशी दारूचा साठा पकडला
By admin | Published: May 29, 2017 2:21 AM