पुणे : समाजातील संस्कृती आणि माणूसकी नाहीशी होत आहे. असा वेळी तिला वाचविण्यासाठी आपणास सर्व समाजाने करूणावादी, अहिंसावादी, मानवतावादी, समाजवादी मूल्ये आत्मसात करून ती आचरणात आणणे गरजेचे आहे. मानवता दु:खमुक्त करण्यासाठी सेवाभावी संस्था व व्यक्ती निर्माण झाल्या तर राज्य, देश समर्थ होईल, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. समर्थ प्रतिष्ठानच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. या कार्यक्रमात स्नेहवन संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते समर्थ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, रंगत संगत प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर, अॅड. प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. डॉ. भोई यांनी स्नेहवन संस्थेतील मुलांचे वैद्यकीय पालकत्व घेण्याचे जाहीर केले. अॅड. अडकर यांनी संस्थेस आर्थिक मदत जाहीर केली. डॉ. सबनीस म्हणाले, ‘आज तरूण मंडळी नोकरी आणि छोकरीमध्ये गुंतलेली आहे. अशावेळी या मंडळींना समाजकार्यात आणणे गरजेचे आहे. ढोल फक्त वाजवून काम होत नाही, या कलेचा वापर समाजकार्यात योगदान देण्यासाठी कार्य करावे लागते. गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.’डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘शिक्षणामुळे समाजाची आणि कुटुंबाची उन्नती होते. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. सर्वांचा विकास करण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे. त्यामुळे सबका विकास करण्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षणाची गरज आहे. पुणे हे शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्थांचेही केंद्र आहे.’
सेवाभावी संस्था, व्यक्तींमुळे देश होईल समर्थ; समर्थ पुरस्कार कार्यक्रमात श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 4:00 PM