पिंपरी : विरोधी पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे, नोटाबंदी जीएसटीमुळे देशात मंदीची लाट असून केंद्र सरकारच्या नाकार्तेपणामुळे अर्थव्यवस्थेचे नियंत्रण चुकले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात साडेतीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशेहून अधिक वाहन विक्रीचे शोरुम बंद पडली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही फटका बसला आहे. यास केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी-चिंचवड शहरात कार्यक्रमासाठी आल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कवीचंद भाट, गौतम आरकडे, संजय बालगुडे, मयुर जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘आर्थिक मंदी रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न आखल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्यांचे केवळ निवडणुकांकडे लक्ष आहे. २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला सुखरुप बाहेर काढले. मात्र, कोणताही जागतिक अर्थतज्ज्ञ केंद्र सरकारबरोबर काम करायला तयार नाही. नोटाबंदीमुळे नुकसान झाले असून जीएसटीमुळे विकासदर घसरला आहे. ’’ ‘‘नवीन किती कारखाने सुरु झाले, किती रोजगार निर्मिती झाली याची माहिती दिली जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात औद्योगिकघसरण झाली असून परकीय गुंतवणुकीची माहिती दिली जात नाही. व्यापार सुलभतेत महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावरून १३ व्या क्रमांकावर गेला आहे. औद्योगिक विकासाबाबतची मोगम आकडेवारी न सांगता श्वेत पत्रीका काढावी.’’
पुण्याचे विमानतळ, मेट्रो लांबणीवर का?सरकारवर पुण्याचे विमानतळ का झाले नाही, मेट्रो लांबणीवर का गेली ? ३० लाख लोकांना रोजगार देण्याचे काय झाले, असे प्रश्न करीत चव्हाण म्हणाले, ‘‘गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेला घोटाळा, सिडकोतीला घोटाळा, पुण्यातील डीपी घोटाळा, समृध्दी महामार्ग जमीन घोटाळा याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्याची दिशाभूल करु नये. केंद्राच्या कालावधीत राष्ट्रीयकृत बँकांत ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. निरव मोदी, ललीत मोदी, चोकसी यांचे आश्रयदाते कोण आहेत. त्यांची नावे समोर येऊ द्या.’’