पुणे : जम्मू येथे एका मुलीचे अपहरण केले जाते,तिच्यावर अत्याचार केले जातात आणि तिला मारले जाते. समाजात घडणाऱ्या याप्रकारच्या सातत्यपूर्ण घटना माणुसकीला पोषक नाही. अशा प्रसंगांमुळे समाजामध्ये दुरावा निर्माण होतानाच देशाच्या सहिष्णुतेला गालबोट लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत माणसाने समोरच्या व्यक्तीचा जात, धर्म न पाहता माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे असे प्रसंग घडू नये यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले. गणेश पेठेतील श्री पोटसुळ्या मारुती मंडळातर्फे तीन गरीब आणि हुशार विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. यावेळी इकबाल दरबार, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ओंकार जाधव, राजेंद्र मांढरे, समीर तिडके, प्रयाग जाधव, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शहा, अभिषेक मारणे, चेतन शिवले, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नवले, पर्यवेक्षिका कल्पना कोल्हे, शिक्षक जनार्दन इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमात तायरा शेख, आयशा शेख, आचल कांबळे या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व मंडळाने स्वीकारले असून मंडळातर्फे साडेचार हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुस्तके, वह्या, गणवेश, दप्तर, बूट या शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. तांबोळी म्हणाले, मुलींवरील अत्याचाराचे दुर्देवी प्रसंग गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे देखील घडले. या सगळ्या प्रकारामधून समाजात वाढत चाललेली विकृती दिसून येते. सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. प्रत्यक्षात सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.’