पुणे : घरामध्ये आईवडिलांसह झोपलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत निर्घृण खून करण्यात आल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना चक्क ‘देशी दारु’च्या बाटलीने दिशा दाखवली. आरोपीने घटनास्थळावर रिचवलेल्या दारुच्या रिकाम्या बाटलीवरील ‘बॅच नंबर २७०’ वरुन पोलीस मद्यविक्रीच्या दुकानापर्यंत पोचले आणि यातील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा छडा लावण्यात यश आले.एरवी पोलिसांना मानवी खबरे किंवा टेक्निकल सपोर्ट तपासादरम्यान महत्त्वाचा ठरतो. या गुन्ह्यात सिंहगड रोड पोलिसांनी गोळा केलेले सीसीटीव्ही फुटेज आणि मद्याची बाटली महत्त्वाची ठरली. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या आसपास आरोपी अजय ऊर्फ बबलू रामेश्वर चौरे (वय २३, रा. नारायण पेठ, मूळ रा. उस्मानाबाद) याने श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) हिचे अपहरण केले. आरोपी चौरे हा श्रुती राहात असलेल्या इमारतीमध्ये बरीच वर्षे राहण्यास होता. त्याला या इमारतीमधील प्रत्येक घरामध्ये कसे जाता येते, त्यांचे दरवाजे कसे आहेत याची पूर्ण माहिती होती. चौरे याचा मित्र सिद्धार्थ कांबळे याची बहीण याच भागात राहण्यास आहे.शनिवारी रात्री चौरे आणि कांबळे यांनी दारू प्यायचे ठरवले. शिवगणे यांच्या घरापासून अवघ्या ७५ ते ८० मीटरवर असलेल्या एका मोकळ्या जागेत हे दोघे गेले. या भागात अर्धवट बांधकाम केलेला चौथरा आहे. तसेच आसपास पाच ते सहा फुट उंच वाढलेले गवत आहे. कांबळे आणि चौरे याने या भागातील मद्याच्या दुकानामधून दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. या बाटल्या घेऊन ते घटनास्थळावर आले. येथील चौथºयावर बसून दारु प्यायले. काही वेळाने कांबळे घरी निघून गेल्यावर चौरे पुन्हा दारुच्या दुकानात गेला. तेथून मद्याची बाटली विकत घेऊन रस्त्याने दारू पित पित पुन्हा घटनास्थळावर आला. त्यानंतर, तो शिवगणे यांच्या घराकडे गेला. लोखंडी दरवाजाच्या फटीमधून हात घालून त्याने हे दार उघडले. त्यानंतर खिडकीमधून हात घालून लाकडी दरवाजा उघडला. गुपचूप घरामध्ये घुसल्यावर त्याने श्रुतीला उचलले. त्यावेळी तिचे वडील खाटेवर झोपलेले होते. तर आई श्रुतीकडे पाठ करुन झोपलेली होती. भिंतीच्या कडेला झोपलेल्या श्रुतीला उचलून तो पसार झाला.घटनास्थळावर गेल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने आरडाओरडा करीत रडायला सुरुवात करताच चौरेने तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह त्याने जवळच्याच गवतामध्ये फेकून दिला. कोणाला संशय येऊ नये म्हणून तो काम करीत असलेल्या ठेकेदाराच्या मूळ गावी शेतामधील ज्वारी काढण्यासाठी गेला. दरम्यान, श्रुतीच्या आईला जाग आल्यावर तिचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालामधून स्पष्ट झाले.कांबळेची बहीण शिवगणे राहत असलेल्या इमारतीमध्ये राहण्यास असल्याने त्याचे या भागात जाणे-येणे होते. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला होता. कसून चौकशी सुरु असतानाच त्याच्याकडून चौरे याच्याबाबत माहिती मिळाली. दोघांनी एकत्र दारु प्यायली असून, तो विकृत असल्याचे समजतात त्याचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक सुनील गवळी यांच्या पथकाने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून ‘लोकेशन’ घेण्यात आले. तो सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुक्यातील परतवाडी येथे असल्याचे समजताच खंडणीविरोधी पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.>पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आरोपी जेरबंदश्रुतीचा मृतदेह मिळाल्यापासून वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी दिवस-रात्र आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न करीत होते. सह आयुक्त रवींद्र कदम यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर अतिरीक्त आयुक्त रवींद्र सेनगावकर आणि प्रदीप देशपांडे, उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सायबर गुन्हे उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त सुरेश भोसले, शिवाजी पवार आणि वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार आदी अधिकारी अक्षरश: दोन रात्र अवघे काही तासच झोपले असतील. उर्वरित सर्व वेळ त्यांनी तपासावरच लक्ष केंद्रित केलेले होते. त्यांच्या अथक परिश्रमाला यश आले असून, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे.>पोलिसांना घटनास्थळावर दारुच्या बºयाच बाटल्या मिळून आल्या होत्या. त्यामध्ये देशी दारुच्या बाटल्या होत्या. या बाटल्यांवर असलेल्या तारखेच्या बाजूला ‘२७०’ क्रमांक होता. त्यावरुन सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, कर्मचारी यशवंत ओंबासे, दयानंद तेलंगे, दत्ता सोनवणे, राहुल शेडगे, श्रीकांत दगडे यांनी हद्दीतील सर्व मद्य दुकानांमध्ये चौकशी करायला सुरुवात केली. दरम्यान, ज्या दुकानामध्ये या बॅचच्या बाटल्यांची विक्री झाली होती, त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा मित्र सिद्धार्थ कांबळे दारु विकत घेताना आढळून आला. गुन्हे शाखा व सिंहगड रोड पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले. त्यावरून कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.कांबळे आणि चौरे याने या भागातील मद्याच्या दुकानामधून दारुच्या बाटल्या खरेदी केल्या. लोखंडी दरवाजाच्या फटीमधून हात घालून त्याने हे दार उघडले. त्यानंतर खिडकीमधून हात घालून लाकडी दरवाजा उघडला. गुपचूप घरामध्ये घुसल्यावर त्याने श्रुतीला उचलले.
देशी दारूच्या बाटलीने दिली तपासाला दिशा, मद्यविक्रीच्या दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजवरून लागला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:00 AM