एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फॉर्मसीच्या वतीने फरमाईश (पीस अॅण्ड हेल्थ) इंटरनेट रेडिओ लाॅंच करण्यात आला. या वेळी भटकर बोलत होते. याप्रसंगी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ फॉर्मसीचे अधिष्ठाता डॉ. ज्ञानेश लिमये, विश्वराज हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विक्रम अग्रवाल, डॉ. बी. एस. कुचेकर उपस्थित होते.
विजय भटकर म्हणाले, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॉर्मा आणि इश या दोन गोष्टींनी मिळून हे रेडिओ चॅनल लाॅंच केले आहे. सध्या आरोग्य शिक्षण आणि हेल्थकेअर सिस्टिम संदर्भातील खरी माहिती जनतेला मिळत नाही, ते देण्याचे काम या माध्यमातून होईल. त्याचप्रमाणे आयुर्वेदाची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. तंत्रज्ञानाच्या काळात टेलिमेडिसनची गरज वाढत असताना याचा मोठा आधार मिळणार आहे.
विश्वनाथ कराड म्हणाले, कोरोनामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आरोग्याविषयी जागृती गरजेचे आहे. फरमाईश रेडिओ चॅनलच्या माध्यमातून आरोग्य जागृती केली जाईल. आनंदी जीवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. यातूनच समग्र समाजनिर्मितीस हातभार लागेल.
कार्यक्रमात डॉ. एन. टी. राव, डॉ. ज्ञानेश लिमये, डॉ. विक्रम अग्रवाल, डॉ. बी. एस. कुचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक, गौतम बापट यांनी सूत्रसंचालन तर डॉ. अक्षय बाहेती यांनी आभार मानले.