पुणे : कोणत्याही पॅथीला विरोध न करता प्रत्येकातली खास वैशिष्टे तसेच त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा वापर करणे हे आवश्यक बनले आहे. अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि मानवी मानसशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून येणाऱ्या ‘संकल्पपँथी’ची देशातल्या वैद्यकीय क्षेत्राला गरज आहे, असे मत संकल्प मानवसंसाधन विकास संस्थेचे संचालक डॉ. पी. एन. कदम यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय क्षेत्रातील पॅथींबाबतचा वाद सध्या उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते सोमवारी (दि. २१) बोलत होते. डॉ. अपूर्वा अहिरराव, डॉ. मनिषा कदम, शर्वरी डोंबे, डॉ. प्रचिती पुंडे, प्रा. सुभाष पतके आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले की, संकल्पपॅथी ही एक विचारप्रणाली आहे. प्रत्येक पॅथीने हातात हात देऊन, एकमेकांना समजून घेऊन जर ती वापरण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक पॅथीतील कार्यकुशलतेचा फायदा रुग्णांना नक्कीच होऊ शकतो. संकल्पपॅथी ही अॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी यासारखी केवळ एकच विशिष्ट औषधोपचार शिकवणारी, पद्धती सुचवणारी पॅथी नसून एका एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचे तत्वज्ञान आहे.
एकविसाव्या शतकात केवळ लाक्षणिक उपचार हा उद्देश ठेवून वैद्यकीय सेवा करण्यापेक्षा व्यक्तीच्या जीवनशैलीचा अभ्यास मनोकायिक आजारांचा अभ्यास, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्थितीचा विचार आवश्यक झाला आहे. त्या-त्या विषयातील तज्ज्ञाने आपल्या पँथीच्या मर्यादा आणि निश्चितता याची जाणीव ठेवली पाहिजे. या पार्श्वभूमीवर एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा स्विकार कालसुसंगत ठरेल, असे मत डॉ. कदम यांनी व्यक्त केले.