पुणे : देशाला सध्या गांधीवादामुळे प्रचंड वेदना हाेत आहेत. आपल्याला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. पुण्यातील नगरसेवक धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाने यावेळी अयाेध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंडळाला भेट दिल्यानंतर भिडे बाेलत हाेते.
भिडे म्हणाले, जेव्हा गरज लागते तेव्हाच देव हाती शस्त्र घेतात. यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला त्या स्वरुपात दिसतो. संत तुकाराम यांनी एकदा आपण सर्वांना विठ्ठलाचे भक्त झालं पाहिजे असं म्हटलं होतं. पण सध्याच्या काळात आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होतो त्याप्रमाणे सध्या देश गांधीवादातून जात आहे. आपण सर्वांनी गणेशोत्सवाची परंपरा जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
घाटे यांच्या मंडळात प्रवेश करताच समाेर भव्यदिव्य राम मंदिराचे प्रवेशद्वार साकारण्यात आले असून आतमध्ये प्रभू रामाची मूर्तीही ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण देखाव्यासाठी 15 लाख रुपयांचा खर्च देखील करण्यात आला आहे. संपूर्ण देखावा भगवामय करण्यात आला आहे.
घाटे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर पाहणं आमचं स्वप्न आहे. यामुळेच आम्ही त्याची प्रतिकृती उभारली आहे. येथे येणाऱ्या भक्तांना आमचा दृष्टीकोन लक्षात येईल आणि प्रभावित होतील अशी अपेक्षा आहे.