बारामती : देशात आताचा काळ फार अडचणीचा आहे, मंदीचे संकट आहे. गुंतवणूक वाढल्याशिवाय देश मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही. सामान्य माणसाची बाजारातून खरेदी करण्याची ताकत जोपर्यंत वाढत नाही. तोपर्यंत व्यापार वाढणार नाही. व्यापार उद्योग वाढल्याशिवाय मंदीचे संकट दूर होणार नाही. मंदीचे संकट आल्यावर अनेक क्षेत्राला त्याची किंमत चुकवावी लागते, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील मंदीबाबत चिंता व्यक्त केली.
बारामती येथील विविध विकासकामांचे पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मागे दहा वर्ष केंद्रीय कृषिमंत्रालयाचे कामकाज पाहताना देशातील बाजार समित्या आपल्या अंतर्गत कार्यरत होत्या. त्यावेळी साहजिकच बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताची जपणुक करता येईल, त्याने पिकविलेला माल देशाच्या बाहेर नेणारा व्यापारी तयार करण्याची खबरदारी घेतली. त्याचे परीणाम शेतकऱ्यांच्या संसारावर दिसले.
आज भारतामध्ये चारचाकी गाडी तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपार ५ लाख पेक्षा अधिक कर्मजाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले. केवळ चारचाकी क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रात हे चित्र आहे. त्यातुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मंदीच्या संकटामुळे बेरोेजगारीचे प्रमाण वाढल्यास अनेकांच्या हाताला काम राहणार नाही. यामध्ये खर्चात कपात करा.पण लोकांच्या हातचे काम काढु नका, असे आवाहन पवार यांनी केले.
संबंध मराठवाड्यात दुष्काळाचे संकट आहे. कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात महापुराचे संकट आले. त्यामुळे सोन्यासारखी पिके हातातुन गेली. अनेकांची घरे पडली. सार्वजनिक वास्तुचे नुकसान झाले, रस्ते वाहुन गेले. चोहोबाजुला सगळे घटक संकटात आले. तर दुसऱ्या बाजुला दुष्काळ असल्याने त्याचा परीणाम व्यापार आणि व्यवहारावर होतो. शेतीमालाच्या किंमतीवर परीणाम होतो, बाजारपेठेवर होतो.संकटाच्या दृष्टचक्रातुन आपण जातो, असे पवार म्हणाले.