लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील सर्व क्षेत्रातल्या असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारने ‘श्रम पोर्टल ई-नोंदणी’ हे पोर्टल सुरू केले आहे. यावर सुमारे ३८ कोटी कामगारांची नोंदणी अपेक्षित असून, माहिती जमा झाल्यावर या कामगारांसाठी आरोग्यासह विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातील.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यासाठीच्या पोर्टलचे अनावरण दिल्लीत २६ ऑगस्टला झाले. नोंदणीनंतर कामगाराला बारा अंकी क्रमांक असणारे एक ओळखपत्र मिळणार आहे. हा क्रमांक त्याची ओळख असेल. राज्याचे कामगार मंत्रालय, असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना यांची मदत या नोंदणीसाठी घेण्यात येईल. कामगारांनाही स्वतंत्रपणे या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.
कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे फार मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. केंद्र सरकारला त्यांच्यासाठी योजना राबवायच्या होत्या, मात्र त्यासाठी लागणारी कसलीही माहिती ना केंद्राकडे होती ना राज्य सरकारकडे. त्यातूनच अशी नोंदणी करण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणीही लगेच सुरू करण्यात आली आहे. देशात १७५ प्रकारचे असंघटित कामगार आहेत. त्यातील ७५ प्रकारचे कामगार महाराष्ट्रात आहेत. त्यांना कोणत्याच कामगार कायद्याचे संरक्षण नाही.
चौकट
हे आहेत प्रमुख असंघटित कामगार
लहान आणि सीमांत शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, विडी कामगार, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, चर्म कामगार, सुतार, वीटभट्टीवरील मजूर, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षा चालक, घरकाम करणारे कामगार, आशा कामगार, दूध उत्पादक.
चौकट
नोंदणीचे मुख्य निकष
-वय १८ ते ५९
-भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनेचे लाभार्थी नसावेत
चौकट
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मोबाइल नंबर, बँक पासबुक, शैक्षणिक माहिती, उत्पन्न दाखला