पुणे : मागील ४ दिवसांपासून शहरात चालू असलेला रेडिओलॉजिस्टचा बेमुदत संप पुण्यात शुक्रवारीही कायम होता. रेडिओलॉजिस्टच्या विविध मागण्यांसाठी चालू असणाऱ्या या संपात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह्यातील रेडिओलॉजिस्टने शुक्रवारी उडी घेतली. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यातील अन्यायकारक तरतुदींच्या आधारावर पुण्यातील रेडिओलॉजिस्टवर केलेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. पुण्यातील ज्येष्ठ रेडिओलॉजिस्टवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केल्याच्या निषेधार्थ हा संप चालू आहे. सध्या मोठ्या रुग्णालयांमध्ये तेही केवळ गंभीर रुग्णांवरच सोनोग्राफी करण्याचा निर्णय पुण्यातील हॉस्पिटल असोसिएशनने घेतला आहे. आजपासून (शनिवार) पिंपरी चिंचवडमधील आणि जिल्ह्यातील रेडिओलॉजिस्टही या संपात सहभागी झाले असून तेही सोनोग्राफी आणि एक्स-रे सेवा बंद ठेवणार असल्याची माहिती इंडियन रेडिओलाजी अँड इमेजिंग असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छान यांनी दिली. २० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा, संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)रुग्णांना वेठीस धरण्यात येत आहे-सोनोग्राफी आणि एक्स-रे या सेवांची गरज असणाऱ्या रुग्णांना संबंधित डॉक्टर धोक्यात घालत आहेत अशी टीका पी.सी.पी.एन.डी.टी समितीच्या राज्य सल्लागार समिती आणि सनियंत्रण समितीच्या सदस्य किरण मोघे यांनी केली. पी.सी.पी.एन.डी.टी कायदा व त्याचे नियम केंद्र सरकारच्या आखत्यारीत येत असल्यामुळे या संपामुळे विनाकारण रुग्णांना आणि सामान्य लोकांना, तसेच पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनास वेठीस धरण्यात येत आहे. -एका डॉक्टरांवर केलेल्या कारवाईची जाहीर चर्चा करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
देशव्यापी ‘सोनोग्राफी बंद’चा इशारा
By admin | Published: June 18, 2016 3:30 AM