पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध लग्नांमध्ये वऱ्हाडी म्हणून प्रवेश करून चोऱ्या करणाऱ्या नवरा बायकोला पुणे ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ९२ तोळे सोने आणि स्वीफ्ट कारसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विलास मोहन दगडे (वय २८, राहणार -चंदननगर, पुणे) व जयश्री विलास दगडे (वय २५, राहणार -चंदननगर पुणे )यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील लग्नांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे वाढते प्रमाण बघता विशेष पथक निर्माण करण्यात आले होते. या पथकाला मिळालेल्या खबरीनुसार यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी मंगल कार्यालयात लग्नातील गोंधळाचा आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे जोडपे येणार असल्याचे समजले. त्यानुसार या कार्यालयात पोलिसांनी सापळा लावला होता.
यावेळी स्विफ्ट कारने आलेल्या या दांपत्याची झडती घेतली असताना त्यांच्याकडे चार तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची आणि इतर १७ ठिकाणी केलेल्या जबरी चोरीची कबुली दिली आहे. या प्रकरणी केलेल्या चौकशीत त्यांच्याकडून ९२तोळे सोने, १० मोबाईल हँडसेट, स्विफ्ट डिझायर कार असा ३७ लाख २७ हजार ४३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जोडप्याने आत्तापर्यंत लोणीकाळभोर येथील मधुबन मंगल कार्यालय, राहू येथील देविका मंगल कार्यालय, राजगड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय, केडगाव चौफुला येथील दत्त मंगल कार्यालय, वाघोली येथील सोयरीक मंगल कार्यालय, उरुळी देवाची येथील स्वराज मंगल कार्यालय, मालेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.