पुणे : फॉरेक्स ट्रेडिंगसारख्या योजनेमध्ये एक लाखांची गुुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २९ गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रद्धा पालांडे (५३, रा. देहू रोड, पुणे) हिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अलीकडेच अटक केली. तिला ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
यातील आरोपी श्रद्धा आणि तिचा पती श्रीकांत यांनी त्यांच्या अनुजा कन्सल्टन्सीतर्फे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक लाखांच्या गुंतवणुकीवर महिना पाच टक्के परतावा मिळेल. अशा आकर्षक तसेच अशक्यप्राय लाभाचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. अनुजा कन्सल्टन्सी या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात तसेच त्यांच्या वैयक्तिक खात्यावर गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारली. मुदतीनंतर कोणताही परतावा अथवा मुद्दल रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केली. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०२१ मध्ये फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासामध्ये अशा २९ गुंतवणूकदारांकडून एक कोटी ८२ लाखांची रक्कम या दाम्पत्याने उकळल्याचे उघड झाले. श्रद्धा पालांडे हिला अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पन्हाळे यांच्या पथकाने २४ मे २०२२ रोजी अटक केली.
एक ते ४० लाखांपर्यंत फसवणूक
जादा परताव्याच्या आमिषाने ठाणे, मुंबई आणि पुण्यातील २९ पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची श्रद्धा आणि श्रीकांत पालांडे या दोघांनी ६९ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. यामध्ये काहींची एक लाख तर काहींची ४० लाखांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत २९ जणांची एक कोटी ८२ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून ही रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. श्रद्धाला अटक झाली असली, तरी तिचा पती आणि घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार श्रीकांत हा पसार असून त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.